अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील महत्वाच्या ८० फुटी रिंग रोडच्या कामावर पाणीटंचाईची झळ बसत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, कोट्यवधी रुपयांच्या या प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. रस्त्याचे काम सुरु असतानाच निष्काळजीपणा आणि दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहराला जोडणाऱ्या या रिंग रोडचे काम सध्या प्रसाद नगर ते मुंदडा गेट दरम्यान सुरू असून, रस्त्याच्या मध्यभागी डिव्हायडर उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या प्रकल्पात ठेकेदाराने दर्जेदार काम न केल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे डिव्हायडरच्या बांधकामावर आवश्यक तेवढे पाणी मारले जात नसल्याचे स्पष्ट दिसून येत असून, त्यामुळे बांधकामाची गुणवत्ता खालावल्याची चर्चा सुरू आहे.

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या कामामुळे गेल्या वर्षभरापासून नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर टाकण्यात येणारी वाळू आणि बांधकाम साहित्य यामुळे रस्ता पार करताना मोठा धोका निर्माण होत आहे. मुंदडा नगर परिसरात विशेषतः ज्या ठिकाणी दोन रस्ते एकमेकांना जोडले जातात, त्या भागात योग्य उतार न करता वाळू व खडी टाकण्यात आल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. गेल्या आठवड्यात येथे काही लहान-मोठे अपघातही घडल्याची माहिती समोर आली आहे.
या संपूर्ण प्रकरणात संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. “आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय” अशी प्रतिक्रिया देत नागरिकांनी प्रशासनावर टीका केली आहे. कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प असताना अशा प्रकारची हलगर्जीपणा होत असल्याने जनतेमध्ये नाराजी वाढत आहे.
तसेच, कामाच्या सुरुवातीपासूनच योग्य पाणी मारले गेले नसल्याने बांधकामाची गुणवत्ता आधीच ढासळलेली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या सुरू असलेल्या डिव्हायडरच्या कामातही पाण्याचा अभाव दिसून येत असल्याने उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हे बांधकाम टिकाऊ राहणार का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या कामाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.



