Home Cities जळगाव  प्रभाग ७ मध्ये मतदार यादी अद्ययावत मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

 प्रभाग ७ मध्ये मतदार यादी अद्ययावत मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  निवडणूक आयोगाच्या ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) मोहिमेअंतर्गत जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गणेश कॉलनीतील दत्त मंदिर येथे शनिवार, २८ मार्चपासून सुरू झालेल्या या दोन दिवसीय शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश मतदार यादीतील त्रुटी दूर करून पारदर्शकता वाढवणे हा आहे. विशेषतः घरातील सुनेच्या माहेरच्या म्हणजेच आई-वडिलांच्या २००२ सालातील तपशीलांची नोंदणी या मोहिमेत केली जात आहे. प्रशासनाकडून नागरिकांना आवश्यक माहिती तयार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून त्यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ होत असल्याचे दिसून येत आहे.

शिबिरात सहभागी होणाऱ्या नागरिकांकडून आई-वडिलांचे पूर्ण नाव, २००२ मधील त्यांचे वास्तव्याचे ठिकाण (गाव, तालुका व जिल्हा), संबंधित विधानसभा मतदारसंघाचे नाव व क्रमांक तसेच मतदार यादीतील भाग क्रमांक आणि अनुक्रमांक अशी महत्त्वाची माहिती घेतली जात आहे. या सर्व माहितीच्या आधारे मतदार यादी अधिक अचूक करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

शनिवारी सकाळी शिबिराचा प्रारंभ होताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. दिवसभर नागरिकांसाठी ही सुविधा खुली ठेवण्यात आली असून शिस्तबद्ध पद्धतीने माहिती संकलनाचे काम सुरू होते. यावेळी आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, स्थायी समिती सदस्य विशाल भोळे, नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे आणि नगरसेविका अंकिता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष शिबिरात उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन केले आणि या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

ज्या नागरिकांनी अद्याप आपली माहिती सादर केलेली नाही, त्यांनी रविवारी २९ मार्च रोजी दत्त मंदिर, गणेश कॉलनी येथे उपस्थित राहून या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मतदार यादी अद्ययावत ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून यामुळे भविष्यातील निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होण्यास मदत होणार असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.


Protected Content

Play sound