Home Cities जळगाव ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव अव्वल! १५० दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव अव्वल! १५० दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्यात प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात’ जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवत मानाचा तुरा रोवला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित विशेष समारंभात मुख्यमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा सन्मान करण्यात आला.

मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या या सोहळ्यात जळगाव जिल्ह्याने डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेण्यात आली. भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) मार्फत करण्यात आलेल्या सर्वंकष मूल्यमापनात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने २०० पैकी १८८ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा आणि कामकाज अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न यामागे महत्त्वाचा ठरला.

या कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे सविस्तर सादरीकरण केले. ई-गव्हर्नन्सच्या सात प्रमुख निकषांवर जळगावने उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. यात अद्ययावत आणि नागरिकांसाठी सुलभ संकेतस्थळ, ‘आपले सरकार’ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी, ई-ऑफिस प्रणालीचा शंभर टक्के वापर, कामकाजावर नजर ठेवण्यासाठी डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर तसेच भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) चा प्रभावी उपयोग यांचा समावेश आहे.

या यशाबद्दल बोलताना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, हे यश जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. नागरिकांच्या सेवेसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून प्रशासन अधिक सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील, असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी हे यश संपूर्ण जळगावकर नागरिकांना समर्पित केले.

जळगाव जिल्ह्याने ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून डिजिटल प्रशासनात घेतलेली झेप ही राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.


Protected Content

Play sound