Home धर्म-समाज देवी यात्रेत रंगला जल्लोष ; डफड्याच्या तालावर रविकांत तुपकरांचा ठेका 

देवी यात्रेत रंगला जल्लोष ; डफड्याच्या तालावर रविकांत तुपकरांचा ठेका 


बुलढाणा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बुलढाणा तालुक्यातील खुपगाव येथे शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या देवी यात्रेत यंदा उत्साहाचा वेगळाच रंग पाहायला मिळाला. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी यात्रेत हजेरी लावत डफड्याच्या तालावर ठेका धरत पारंपरिक नृत्य सादर केले, ज्यामुळे उपस्थित ग्रामस्थ आणि भाविक अक्षरशः भारावून गेले.

खुपगावातील देवीची यात्रा ही परिसरातील अत्यंत जुनी आणि श्रद्धेची मानली जाणारी परंपरा आहे. या यात्रेत देवीचे सोंग हे प्रमुख आकर्षण असून दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या पारंपरिक उत्सवात रविकांत तुपकर हे दरवर्षी उपस्थित राहून देवीची मनोभावे पूजा करतात. यंदाही त्यांनी यात्रेला उपस्थिती दर्शवत परंपरेप्रती आपली निष्ठा जपली.

यात्रेदरम्यान भाविकांच्या आग्रहास्तव रविकांत तुपकर यांनी डफड्याच्या तालावर ठेका धरला. पारंपरिक वाद्याच्या सुरांवर त्यांनी धरलेला ताल आणि त्यांची उत्स्फूर्त नृत्यशैली पाहून उपस्थितांमध्ये उत्साहाची लाट उसळली. देवीच्या सोंगासमोर त्यांनी ‘पावली’ दाखवत पारंपरिक नृत्य सादर केले, ज्यातून ग्रामीण संस्कृतीशी त्यांचे घट्ट नाते अधोरेखित झाले.

यावेळी रविकांत तुपकर यांनी स्वतः डफडे वाजवून वादकांना साथ दिली तसेच ग्रामस्थांच्या उत्साहात भर घातली. त्यांच्या या अनोख्या सहभागामुळे यात्रेचा माहोल अधिक रंगतदार झाला. गावकऱ्यांनीही त्यांच्या या सहज आणि मनमिळाऊ स्वभावाचे कौतुक केले.

रविकांत तुपकर यांचे हे आगळेवेगळे रूप पाहून ग्रामस्थ आणि भाविक आश्चर्यचकित झाले. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले नेते अशा पारंपरिक कार्यक्रमात इतक्या उत्साहाने सहभागी होत असल्याचे पाहून अनेकांनी समाधान व्यक्त केले.


Protected Content

Play sound