Home राजकीय वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणी चौकशीअंती निर्णय घेणार; देवेंद्र फडणवीस 

वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणी चौकशीअंती निर्णय घेणार; देवेंद्र फडणवीस 


मुंबई-वृत्तसंस्था : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडिओची शहानिशा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर झिरवळ यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला तृतीयपंथी दिसत असून, त्यांच्यासमोर खाद्यपदार्थ आणि मद्याच्या बाटल्याही दिसून येत आहेत. या व्हिडिओमुळे झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

या संदर्भात फडणवीस म्हणाले की, झिरवळ यांनी मला फोन करून सांगितले की, हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आला आहे. तीन ते चार वेगवेगळ्या व्हिडिओंचा वापर करून तो जोडण्यात आला आहे. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. मी त्यांना तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला आहे.

या व्हिडिओची सत्यता पडताळून त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. “अजित पवार यांच्या पक्षाचे नेते सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून आम्ही योग्य निर्णय घेऊ,” असे ते म्हणाले.

मागच्या काळात घडलेल्या घटनांच्या चौकशीमध्ये झिरवळ यांचा संबंध दिसून आला नाही, असे फडणवीस म्हणाले. मात्र, आता जो व्हिडिओ समोर आला आहे तो गंभीर आहे. त्याची सत्यता पडताळली जाईल. जर हा व्हिडिओ खरा असेल तर नक्कीच कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

नरहरी झिरवळ हे विधानसभा उपाध्यक्ष आणि दिंडोरीचे आमदार आहेत. त्यांच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तीवर मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. हे दृश्य सुमारे सात महिन्यांपूर्वीचे असल्याचे बोलले जात आहे. एका लोकप्रतिनिधीच्या शासकीय निवासात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती अशा परिस्थितीत दिसल्याने नैतिकतेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


Protected Content

Play sound