जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनी पूर्वा नारायण चौधरी हिने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कास्य पदक पटकावले असून, महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. तिच्या या यशामुळे क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयाची परंपरा अधिक भक्कम झाली आहे.
पूर्वा चौधरी ही कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा सायन्स विभागाची विद्यार्थिनी असून तिची निवड डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या तायक्वांदो संघात झाली होती. ओडिशा राज्यातील फकीर मोहन विद्यापीठ येथे १६ ते २० मार्च २०२६ दरम्यान झालेल्या या स्पर्धेत देशभरातील नामांकित विद्यापीठांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील उच्च दर्जाची स्पर्धात्मकता लक्षात घेता पूर्वाने दाखवलेली कामगिरी विशेष ठरली.

५२ किलो वजन गटात खेळताना पूर्वा हिने दमदार आणि आत्मविश्वासपूर्ण खेळ सादर केला. सलग चार सामने जिंकत तिने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या फेरीत तिने महात्मा गांधी काशी विद्यापीठ, वाराणसी येथील प्रतिस्पर्धी खेळाडूवर दुसऱ्या फेरीत २२-११ अशा गुणांनी मात करत कास्य पदकावर आपले नाव कोरले. तिच्या या विजयामुळे गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पूर्वाच्या या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील (डी.एम. कार्डिओलॉजिस्ट), डॉ. अनिकेत पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, क्रीडा संचालक डॉ. जयंत जाधव, संबंधित विभागप्रमुख आणि शिक्षकवृंद यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पूर्वा चौधरीच्या या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्राबाबत प्रेरणा निर्माण झाली असून, महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेला नवी उंची मिळाली आहे.



