Home धर्म-समाज श्रीराम जन्मोत्सवानिमित्त शोभायात्रेत भाविकांचा उसळला उत्साह

श्रीराम जन्मोत्सवानिमित्त शोभायात्रेत भाविकांचा उसळला उत्साह


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमित्त जळगाव शहर आज पूर्णपणे भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले. सकाळपासूनच शहरातील विविध राम मंदिरांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली, तर सायंकाळी निघालेल्या भव्य शोभायात्रेने संपूर्ण शहर ‘राममय’ झाले होते.

दिवसभर शहरातील मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भजन, कीर्तन, रामनामाचा जप आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे वातावरण भक्तिरसात बुडाले होते. प्रत्येक ठिकाणी ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

सायंकाळी ५ वाजता गोलाणी मार्केट येथील श्री हनुमान मंदिरात महाआरतीने सोहळ्याची सुरुवात झाली. प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. या प्रसंगी आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी महापौर सीमाताई भोळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक नितीन गणापुरे, नगरसेविका सुचिता हाडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महाआरतीनंतर भव्य शोभायात्रेला उत्साहात सुरुवात झाली. घोडागाडीवरील बग्गीत प्रभू श्रीरामांची आकर्षक प्रतिमा विराजमान करण्यात आली होती. यंदा शालेय विद्यार्थ्यांच्या पौराणिक वेशभूषेने सर्वांचे विशेष लक्ष वेधले. कोणी विठ्ठल, कोणी छत्रपती शिवाजी महाराज, तर कोणी राम, लक्ष्मण आणि हनुमानाच्या वेशात सहभागी झाले होते. वारकरी वेशभूषेतील चिमुकल्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर दिलेला ठेका पाहून उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता.

मिरवणुकीत लोकप्रतिनिधीही मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. आमदार राजूमामा भोळे, उपमहापौर मनोज चौधरी आणि नगरसेवक पीयूष कोल्हे यांनी ढोल-ताशांच्या गजरावर ठेका धरत कार्यकर्त्यांचा उत्साह दुप्पट केला. महिलांनी नऊवारी साड्या आणि पुरुषांनी पारंपरिक फेटे परिधान करून मिरवणुकीत रंग भरला. हातात भगवे ध्वज आणि ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने संपूर्ण परिसरात भक्तिमय ऊर्जा निर्माण झाली होती.

गोलाणी मार्केटपासून सुरू झालेली ही शोभायात्रा नेक्स्ट शोरूम, महापालिका चौक, शास्त्री टॉवर चौक, दाणाबाजार, सुभाष चौक मार्गे जुन्या जळगावातील श्रीराम मंदिरात पोहोचली. मार्गावर विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. सामाजिक संस्थांनी पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था करून भाविकांची सेवा केली. पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवत मिरवणूक शांततेत आणि सुव्यवस्थित पार पाडली.


Protected Content

Play sound