जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महापालिकेच्या सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाला स्थायी समितीच्या विशेष सभेत अंतिम मंजुरी देण्यात आली असून, करवाढ न करता तब्बल १५२५ कोटी १२ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याने नागरिकांसाठी दिलासा देणारा निर्णय मानला जात आहे.
महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी यापूर्वी १४५२ कोटी १० लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. या अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नव्हती. त्यानंतर स्थायी समितीने यावर सविस्तर चर्चा करत महसुलात वाढ आणि खर्चात काही बदल सुचविले होते. त्या अनुषंगाने आज बुधवारी (दि.२५) झालेल्या विशेष सभेत दुरुस्तीसह अंतिम मंजुरी देण्यात आली.

महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी व्यासपीठावर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त धनश्री शिंदे, लेखाधिकारी विजय सोनवणे आणि नगरसचिव सतीश शुक्ला उपस्थित होते. सभेत अंदाजपत्रकावर सखोल चर्चा करून विविध तरतुदींमध्ये बदल करण्यात आले.
मागील स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्तांनी सन २०२५-२६ चे सुधारित अंदाजपत्रक आणि २०२६-२७ चे मूळ अंदाजपत्रक सादर केले होते. यामध्ये ८ कोटी ५८ लाख रुपये शिल्लक दाखवत १४५२ कोटी १० लाख रुपयांचे अंदाजपत्रक मांडण्यात आले होते. त्यानंतर अधिक अभ्यासासाठी सभा तहकूब करण्यात आली होती आणि आजच्या विशेष सभेत त्यावर अंतिम निर्णय घेण्यात आला.
आजच्या बैठकीत सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी मूळ अंदाजपत्रकात महत्त्वपूर्ण दुरुस्त्या केल्या. महसुली उत्पन्नात ५२ कोटी ५६ लाख ८६ हजार रुपयांची वाढ करण्यात आली. त्याचबरोबर शहरातील मूलभूत सुविधांवरील खर्च वाढविण्यात आला, तर काही विभागांमध्ये खर्चात कपात करण्यात आली. या सर्व बदलांनंतर दुरुस्तीसह १५२५ कोटी १२ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.
महसुली वाढ आणि खर्चातील बदलांच्या तपशीलानुसार, एकूण महसुल जमा ५२ कोटी ५६ लाख ८६ हजार रुपयांनी वाढविण्यात आला आहे. महसुल खर्चात १३ कोटी ३२ लाख रुपयांची वाढ करण्यात आली असून, असाधारण देवघेव खर्चात ११ कोटी ३३ लाख ८५ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. भांडवली खर्चात १९ कोटी ९५ लाख रुपयांची वाढ करण्यात आली असून, पाणीपुरवठा विभागासाठीही अतिरिक्त ७ कोटी ८६ लाख ३२ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकूण खर्चात ५२ कोटी ४७ लाख १७ हजार रुपयांची वाढ दर्शविण्यात आली आहे. जमा व खर्चातील तफावत ९ कोटी ६९ लाख रुपये इतकी नोंदविण्यात आली आहे.



