भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उसने घेतलेले ४ हजार रुपये परत मागितल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात भीषण हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना भुसावळमधील आगाखान वाडा परिसरात घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी तरुणासह त्याची पत्नी आणि वृद्ध वडील गंभीर जखमी झाले असून, बाजारपेठ पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाहरुख शेख हसिद उर्फ मुन्ना (वय २८, रा. आगाखान वाडा) यांनी संशयित जमिना रउफ कुरेशी हिच्याकडून ४ हजार रुपये उसने घेतले होते. संशयित आरोपींनी हे पैसे परत मागितले असता, शाहरुख यांनी “मी तुमचे पैसे परत केले आहेत” असे सांगितले. याच कारणावरून संशयित आरोपी रहिम रउफ कुरेशी, जमिला रउफ कुरेशी या दोघांनी शाहरुख यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

शाब्दिक वादाचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले. जमिना कुरेशी हिने रस्त्यावर पडलेला लोखंडी पाईप उचलून शाहरुख यांची पत्नी फरहीन हिच्या कमरेवर आणि गुडघ्यावर प्रहार केला. इतक्यावरच न थांबता, रहिम रउफ कुरेशी याने घरातून लोखंडी वस्तू आणून “पैसे दे नाहीतर तुला जीवाने मारून टाकीन” अशी धमकी देवून मारहाण केली. यात ते जखमी झाले. भांडण सोडवण्यासाठी आलेले शाहरुख यांचे वडील हसिद उर्फ मुन्ना आणि भाऊ मोहसिन शेख यांनाही दोघांना बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉस्टेबल तेजस पारिसकर हे करीत आहे.



