जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जन्मतः सेरेब्रल पाल्सी या दुर्मिळ विकाराने ग्रस्त असतानाही जिद्द, आत्मविश्वास आणि कष्टाच्या जोरावर जीवनात यश मिळवणाऱ्या शान्तनू वगदे या तरुणाने ‘मेरी आत्मकथा- शान्तनू वगदे’ हे प्रेरणादायी पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यांच्या या प्रवासाने अनेकांसाठी नवा आदर्श निर्माण केला असून जळगावात माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्याशी झालेला त्यांचा संवाद विशेष ठरला.
इंदौर येथील ३६ वर्षीय शान्तनू वगदे यांना जन्मापासूनच सेरेब्रल पाल्सी हा विकार जडला होता. जन्मानंतर झालेल्या काविळीमुळे आणि त्यावेळी झालेल्या वैद्यकीय दुर्लक्षामुळे त्यांच्या शारीरिक हालचालींवर परिणाम झाला. मात्र, शारीरिक अडचणी असूनही त्यांची बुद्धिमत्ता सामान्य व्यक्तीप्रमाणेच सक्षम राहिली. त्यांच्या आई उषा विवरेकर यांनी अपार मेहनत, जिद्द आणि ममतेच्या जोरावर शान्तनू यांचे संगोपन करत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात ठेवले.

आईच्या पाठबळामुळे शान्तनू यांनी सर्व अडचणींवर मात करत बी.कॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या या यशाने समाजात प्रेरणेचा नवा संदेश दिला. आयुष्यातील संघर्ष, अनुभव, भेटलेली माणसे आणि आलेल्या अडचणी यांचे जिवंत चित्रण त्यांनी ‘मेरी आत्मकथा- शान्तनू वगदे’ या पुस्तकातून मांडले आहे. या आत्मकथेमुळे त्यांच्या जीवनप्रवासाची प्रेरणादायी कहाणी सर्वांसमोर आली आहे.
सोमवारी (२३ मार्च) शान्तनू वगदे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांची भेट घेतली. उषा विवरेकर आणि डॉ. पाटील यांचे जुने कौटुंबिक संबंध असल्याने ही भेट अधिक आत्मीयतेची ठरली. या भेटीदरम्यान डॉ. पाटील यांनी शान्तनू यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. बोलण्यात अडचण असतानाही शान्तनू यांच्या भावना त्यांनी अचूक ओळखल्या आणि त्यांना प्रोत्साहन दिले.
यावेळी डॉ. पाटील यांनी प्रख्यात न्युरोविकार तज्ज्ञांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधून शान्तनू यांच्या पुढील उपचारांची जबाबदारी स्वीकारली. शारीरिक अडथळ्यांवर मात करून जीवन जगण्याची शान्तनू यांची जिद्द ही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे शारीरिक मर्यादा असूनही मोठी स्वप्ने पाहता येतात आणि ती पूर्ण करता येतात, हा संदेश अधोरेखित झाला.



