चोपडा प्रतिनिधी । येथील पुरवठा विभागातील लिपिक निलेश अशोक गायकवाड (३४)(मूळ रहिवासी भुसावळ) यांचा अनेर नदीच्या डोहात बुडून मृत्यू झाला असून दोघांना वाचविण्यात यश आले आहे.
याबाबत वृत्त असे की, चोपडा येथील पुरवठा विभागातील लिपिक निलेश गायकवाड ,अव्वल कारकून रवींद्र नेतकर आणि रेशन दुकानदार मधुकर राजपूत,अरुण पाटील यांच्यासह दहा जण दि २७ रोजी सकाळी चोपडा येथून ताजोद्दीन बाबा यात्रेसाठी निघाले होते. रस्त्यातच अनेर नदीवर असलेल्या पुलावर सर्व थांबले.आणि यापैकी लिपिक निलेश गायकवाड हे पुलाखाली शौचासाठी नदीत उतरले होते. मात्र निलेश गायकवाड यांचा पाय घसरल्याने नदीत असलेल्या डोहात ते बुडाले. त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने ते बेशुद्ध झाले. त्याच स्थितीत गायकवाड यांना वरला ता.सेंधवा जि बडवाणी (मध्यप्रदेश) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र निलेश गायकवाड यांना मृत घोषित केले. तर त्यांना काढण्यासाठी दोन जण उतरले असतांना तेदेखील डुबण्याचा धोका होता. मात्र त्यांना वाचविण्यात आले.
निलेश गायकवाड हे सुस्वभावी असल्याने त्यांच्या मृत्यूने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गायकवाड यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.