चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रस्त्यात गुरे बांधल्याचा जाब विचारल्याने एका शेतकऱ्याला आणि त्यांच्या पत्नीला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहरातील रहिवासी विकास लोटण पाटील (वय ३६) हे २१ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास आपल्या शेतातून काम संपवून घरी परतत होते. यावेळी रस्त्यात हिरामण सुकदेव कोळी यांनी आपली गुरे बांधलेली होती, ज्यामुळे रस्ता अडला होता. विकास पाटील यांनी रस्ता मोकळा करण्यासाठी गुरे बाजूला बांधण्यास सांगितले. या साध्या गोष्टीचा राग मनात धरून हिरामण कोळी, त्यांचा मुलगा हितेश कोळी आणि पत्नी आशाबाई कोळी यांनी मिळून विकास पाटील यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद इतका वाढला की, हितेश कोळी याने रस्त्यावरील वीट उचलून विकास पाटील यांच्या कपाळावर डाव्या बाजूला जोरात मारली. या हल्ल्यात पाटील गंभीर जखमी झाले आहेत.

भांडण सोडवण्यासाठी पाटील यांची पत्नी पुढे आली असता, आरोपींनी त्यांनाही धक्काबुक्की व शिवीगाळ केली. यावेळी झटापटीत फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याच्या मण्यांची पोत ओढून नुकसान केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार बापू साळुंखे हे करीत आहे.



