Home राष्ट्रीय भारतीय आयुर्वेदिक उत्पादनांना वाढतेय जागतिक मागणी !

भारतीय आयुर्वेदिक उत्पादनांना वाढतेय जागतिक मागणी !


मुंबई-वृत्तसेवा | जागतिक बाजारपेठ सध्या भू-राजकीय तणाव, युद्धजन्य परिस्थिती आणि पुरवठा साखळीतील अडचणींमुळे मोठ्या उलथापालथीचा सामना करत असताना भारत मात्र व्यापाराच्या केंद्रस्थानी अधिक मजबुतीने उभा राहत असल्याचे चित्र आहे. युरोप आणि अमेरिकेसोबत झालेले महत्त्वाचे व्यापार करार भारताच्या जागतिक भूमिकेला नवे बळ देत आहेत.

अलीकडेच युरोपसोबत झालेल्या मोठ्या व्यापार कराराला ‘मदर ऑफ ऑल ट्रेड डील्स’ असे संबोधले जात असून, या करारामुळे मुक्त व्यापाराचे नवे मार्ग खुले झाले आहेत. याचबरोबर भारत-अमेरिका व्यापार करारामुळे टेरिफसंबंधित अडथळे कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकन उत्पादनांचा भारतातील प्रवेश अधिक सुलभ होणार असून, दोन्ही देशांमधील व्यापार वृद्धिंगत होण्याची चिन्हे आहेत. जागतिक स्तरावर बदलत असलेल्या व्यापार धोरणांमध्ये भारत विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयास येत आहे.

दरम्यान, न्यूट्रास्युटिकल्स आणि हेल्थ सप्लिमेंट्स बाजारपेठेत भारत आणि चीनवर जगाचे मोठ्या प्रमाणावर अवलंबित्व आहे. या क्षेत्रातील ८० टक्क्यांहून अधिक कच्चा माल आशियातून पुरवला जातो. औषधी वनस्पती, मसाले आणि वनस्पतींचे अर्क हे या उद्योगाचे प्रमुख घटक ठरत आहेत. अलीकडील पुरवठा साखळीतील अडचणी आणि व्यापारी निर्बंधांमुळे अनेक कंपन्या व्हिएतनाम आणि श्रीलंका यांसारख्या देशांकडे पर्याय म्हणून पाहू लागल्या आहेत.

भारताच्या हेल्थ सप्लिमेंट्स बाजारपेठेत दिग्गज कंपन्यांची मोठी उपस्थिती दिसून येते. २०२४ मध्ये ‘नेस्ले’ आणि ‘डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज’ यांच्यात झालेल्या भागीदारीमुळे उत्पादनांचे वितरण अधिक व्यापक झाले आहे. ‘रेकिट’, ‘हिमालय वेलनेस’, ‘एबॉट इंडिया’ आणि ‘सन फार्मा’ यांसारख्या कंपन्याही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी भूमिका बजावत आहेत.

भारतातील मध्यम आणि उच्चवर्गीय ग्राहकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हेल्थ सप्लिमेंट्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. तणाव कमी करणे, सौंदर्य, महिलांचे आरोग्य आणि फिटनेस यांसारख्या गरजांमुळे मॅग्नेशियम, ओमेगा-३, कोलेजन आणि प्लांट प्रोटीन यांसारख्या उत्पादनांचा वापर वाढला आहे. पाश्चात्य देशांच्या ट्रेंडचा प्रभाव भारतीय बाजारपेठेवर स्पष्टपणे दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर भारताची पारंपरिक आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती आता जागतिक बाजारपेठेत विशेष ठसा उमटवत आहे. अश्वगंधा, हळद आणि आवळा यांसारख्या औषधी वनस्पतींना प्रचंड मागणी निर्माण झाली आहे. आधुनिक विज्ञानाच्या आधारामुळे आयुर्वेदिक उत्पादनांना अधिक विश्वासार्हता मिळत असून, क्लिनिकल रिसर्च आणि नवीन फॉरमॅट्समुळे या उद्योगाला गती मिळत आहे.


Protected Content

Play sound