जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नंदगाव-फेसर्डी परिसरातील शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण करत 33/11 केव्ही क्षमतेच्या नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळणार असून ग्रामस्थांना २४ तास अखंड वीज उपलब्ध होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणे हेच त्यांचे कर्तव्य आहे. पूर्वी ट्रान्सफॉर्मर व वीज उपकेंद्राच्या प्रश्नांसाठी आंदोलन करावे लागले होते, मात्र आता त्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी पाणी, वीज आणि रस्ता या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र कृषी धोरण 2020 अंतर्गत सुमारे 4 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या उपकेंद्रामुळे परिसरातील वीज समस्येवर मोठा दिलासा मिळणार आहे. जळगाव व धरणगाव तालुक्यात सुमारे 32 कोटी रुपयांच्या निधीतून उपकेंद्र, रोहित्रे आणि लाईन सुधारणा कामे सुरू असल्याची माहिती देण्यात आली. भविष्यात गरज भासल्यास येथे 5 एमव्हीए क्षमतेचा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसविण्याची ग्वाहीही पालकमंत्र्यांनी दिली.
या कार्यक्रमात नंदगाव येथील गावांतर्गत काँक्रिटीकरणासाठी 15 लाख रुपये, पिलखेडा येथील स्मशानभूमी पोहोच रस्ता व गावांतर्गत काँक्रिटीकरणासाठी 30 लाख रुपये या कामांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच नंदगाव-फेसर्डी-किनोद मार्गाच्या डांबरीकरणासाठी 60 लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. परिसरातील सुमारे 150 कोटी रुपयांच्या भोकर पुलाचे काम प्रगतीपथावर असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सभापती राजेंद्र चव्हाण यांनी केले. प्रास्ताविकात उपकार्यकारी अभियंता विजय कपुरे यांनी वीज उपकेंद्राबाबत सविस्तर माहिती दिली, तर आभार विभाग प्रमुख गजानन सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाला विविध पदाधिकारी, अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



