रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, चक्क एका नगरसेवकाच्या घरावर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. पोलीस स्टेशनपासून अवघ्या ४०० मीटर अंतरावर राहणारे नगरसेवक दिलीप हिरामण पाटील यांच्या घरात घुसून चोरट्यांनी ११ तोळे सोने, २५० भार चांदी आणि १० लाख रुपयांची रोकड असा मोठा ऐवज लंपास केला आहे. या धाडसी चोरीमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेवक दिलीप पाटील हे रामबाग मैदान परिसरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे लोखंडी गज कापून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, ज्यात सोन्याची पोत, अंगठ्या, चपला हार अशा सुमारे ११ तोळे वजनाच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. तसेच २५० भार वजनाचे चांदीचे तोडे देखील चोरून नेले.

१० लाखांची रोकड लंपास :
दिलीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी नुकतेच त्यांचे गट क्रमांक ७७६/१ हे शेत विकले होते. या व्यवहाराचे आलेले १० लाख रुपये घरातच ठेवले होते. चोरट्यांनी दागिन्यांसोबतच ही मोठी रोकडही लंपास केली आहे. एकूण चोरीला गेलेल्या मालाची किंमत पाहता हा आकडा साडे अठरा लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
पोलीस तपासाची चक्रे फिरली :
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर आणि पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी भेट दिली. चोरीचे गांभीर्य लक्षात घेता जळगाव येथून ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.



