भुसावळ, प्रतिनिधी | राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ चे चारपदरीकरण व सहापदरीकरणाचे काम वेगाने काम सुरु आहे. या महामार्गापासून जवळच असलेल्या चांगदेव व हरताळा यागावात ऐतिहासिक व प्राचीन मंदिरे आहेत, येथे मोठया प्रमाणावर भाविक व पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे याठिकाणी अंडरपास रस्त्याला भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास मंत्री ना. नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात कोथळी शिवारात शेतकी महाविद्यालयाचे बांधकाम सुरू आहे. सालबर्डीच्या दक्षिणेकडे अल्पसंख्यांकांसाठी डिप्लोमा कॉलेजचे बांधकाम सुरू असून, नुकतीच शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळाली असून ते काम देखील लवकरच सुरू होणार आहे. मुक्ताईनगर, सालबर्डी, कोथळी या गावामधील हजारो शेतकरी बांधवांची शेती या हायवेच्या दुतर्फा आहे. या राष्ट्रीय महामार्गावरील व्यस्त आणि जड वाहतुकीला बाधा न येण्यासाठी गावकरी, भाविक, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी या नवीन राष्ट्रीय महामार्गावर बाहेर पडण्यासाठी मार्ग आणि अंडरपास तयार करण्याची मागणी माजीमंत्री आ. खडसे व खासदार रक्षाताई खडसे यांच्याकडे पं.स. उपसभापती प्रल्हाद जंगले, राजू पाटील, जे के चौधरी, जयेश कार्ले, संजय चौधरी, ईश्वर रहाणे, अतुल पाटील, आनंदा देशमुख, शंकर चव्हाण, समाधान कार्ले, निवृत्ती भड व असंख्य ग्रामस्थांनी नुकतीच केली आहे.
या विषयावर खासदार रक्षाताई खडसे यांनी सांगितले की. नुकतीच दिल्ली येथे माजीमंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा विषय मांडला असता त्यांनी या अंडरपासला मंजुरी दिली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. या निर्णयाने हरताळे, वढवे, चांगदेव, चिंचोल, मेहुण, मानेगाव, कोथळी, सालबर्डी या गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.