Home उद्योग गॅसटंचाईचा मुंबईला मोठा फटका ; उद्योग बंद, कामगारांचे ‘रिव्हर्स मायग्रेशन’ सुरू!

गॅसटंचाईचा मुंबईला मोठा फटका ; उद्योग बंद, कामगारांचे ‘रिव्हर्स मायग्रेशन’ सुरू!


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । महाराष्ट्रात घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा तुटवडा नसल्याचा दावा सत्ताधारी नेत्यांकडून वारंवार केला जात असला, तरी प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती अत्यंत भयावह असल्याचे समोर येत आहे. गॅसच्या तीव्र टंचाईमुळे मुंबईतील गॅसवर आधारित अनेक छोटे-मोठे उद्योग पूर्णपणे ठप्प झाले आहेत. याचा थेट फटका हातावर पोट असलेल्या कामगार वर्गाला बसला असून, उपासमारीची वेळ आल्याने हजारो कामगार आता मुंबई सोडून आपल्या मूळ गावी परतू लागले आहेत.

उत्पादन थांबले, कारखान्यांना टाळे :
केवळ अन्नपुरवठाच नव्हे, तर गॅसवर अवलंबून असलेले असंख्य कारखाने सध्या संकटात सापडले आहेत. इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने उत्पादन प्रक्रिया थांबली आहे. मागणी असूनही माल तयार करता येत नसल्याने अनेक कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मालकांनी काम कपात सुरू केल्याने कामगार वर्ग बेरोजगार झाला आहे. मुंबईसारख्या महागड्या शहरात काम नसल्याने राहणे अशक्य झाल्यामुळे कामगारांनी स्थलांतराचा मार्ग स्वीकारला आहे.

रेल्वे स्थानकांवर कामगारांची तुफान गर्दी :
या परिस्थितीचे विदारक चित्र मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांवर पाहायला मिळत आहे. विशेषतः उत्तर भारतीय कामगार मोठ्या संख्येने आपल्या गावी परतण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर सारख्या स्थानकांवर गर्दी करत आहेत. हातातील काम गेल्याने “आता मुंबईत राहून करायचे काय?” असा उद्विग्न सवाल हे कामगार विचारत आहेत.

इतर क्षेत्रांनाही बसणार मोठा फटका :
तज्ज्ञांच्या मते, हा गॅस तुटवडा केवळ इंधनापुरता मर्यादित राहणार नाही. कच्च्या तेलापासून केवळ गॅस आणि पेट्रोलच नव्हे, तर प्लास्टिक, कॉस्मेटिक्स, डांबर यांसारखी महत्त्वाची उत्पादनेही तयार होतात. जर ही टंचाई लवकर दूर झाली नाही, तर औषध निर्मितीपासून ते रस्ते बांधकामापर्यंतच्या सर्वच क्षेत्रांवर याचे दुरगामी आणि वाईट परिणाम दिसून येतील. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना न केल्यास राज्याची औद्योगिक अर्थव्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound