जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेकडून थकीत मालमत्ता धारकांसाठी दिलासादायक निर्णय घेत अभय योजनेला आणखी १२ दिवसांची अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मालमत्ता कराच्या थकीत शास्तीवर (दंड) १०० टक्के माफी मिळणार असून, नागरिकांसाठी ही शेवटची सुवर्णसंधी ठरणार आहे.
महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकारातून आणि प्रशासनाच्या निर्णयानुसार ही मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. २० मार्च ते ३१ मार्च या कालावधीत नागरिकांनी मूळ मालमत्ता कर भरल्यास त्यांना संपूर्ण शास्ती माफ करण्यात येणार आहे. उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना प्रभावीपणे राबवली जात आहे.
शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांवरील आर्थिक बोजा कमी करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे. महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांना आवाहन करत, ही शेवटची मुदतवाढ असल्याने संधीचा लाभ घेऊन त्वरित मालमत्ता कर भरावा आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे स्पष्ट केले आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धती उपलब्ध करून दिल्या आहेत. jalgaonmc.org या संकेतस्थळावरून तसेच देयकावरील QR कोड स्कॅन करून UPI किंवा नेट बँकिंगद्वारे कर भरणा करता येणार आहे. याशिवाय महापालिका कार्यालयात धनादेश किंवा डिमांड ड्राफ्टद्वारेही रक्कम स्वीकारली जाणार आहे. विशेष म्हणजे, महापालिका कर्मचारी थेट नागरिकांच्या ठिकाणी जाऊनही वसुली करणार आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मालमत्ता कराची मूळ रक्कम पूर्ण भरणे अनिवार्य आहे. यापूर्वी शास्ती भरलेल्या नागरिकांना कोणताही परतावा मिळणार नाही, तसेच नुकसानभरपाईची मागणी केलेल्या मालमत्तांना या योजनेचा लाभ लागू होणार नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.



