भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथे केळी उत्पादक शेतकऱ्यांसोबत आयोजित संवाद कार्यक्रमात शेतीविषयक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा रंगली असून, ज्वारी खरेदी कोटा वाढवण्याची मागणी प्रमुख ठरली. भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील अँड काकासाहेब भोसले यांनी ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने सरकारसमोर ठोस भूमिका मांडली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात त्यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत विविध समस्यांवर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत शेती क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, आमदार अमोल जावळे तसेच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात केळी पिकाबरोबरच कापूस आणि मका या पिकांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी अँड विश्वासराव भोसले यांनी जळगाव जिल्ह्यातील ज्वारी उत्पादनाच्या संदर्भात गंभीर मुद्दे उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते आणि हेक्टरी 75 ते 100 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. मात्र, सरकारकडून हमीभाव योजनेअंतर्गत फक्त 16.50 क्विंटल ज्वारीच खरेदी केली जाते, ही बाब शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.
ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी किमान 50 क्विंटलपर्यंत शासकीय खरेदी वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली. यासोबतच जळगाव जिल्ह्यासाठी सध्या असलेला 1.5 लाख क्विंटलचा कोटा वाढवून तो 5 लाख क्विंटलपर्यंत करावा, अशीही मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे मांडली. खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याची आवश्यकता अधोरेखित करत शेतकऱ्यांना सुलभता मिळावी, यासाठी तातडीने निर्णय घेण्याची विनंतीही करण्यात आली.
या संवाद कार्यक्रमातून शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि अपेक्षा थेट केंद्रीय पातळीवर पोहोचल्याचे चित्र दिसून आले. शेतीमालाला योग्य दर, खरेदी प्रक्रिया सुलभ करणे आणि उत्पादनाला प्रोत्साहन देणे या मुद्द्यांवर सकारात्मक निर्णयाची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.



