मुंबई-वृत्तसेवा । भारतीय शेअर बाजारात आज प्रचंड अस्थिरता पाहायला मिळाली असून जोरदार विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली आहे. सलग तीन दिवसांच्या तेजीनंतर बाजार अचानक कोसळल्याने गुंतवणूकदारांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. जागतिक घडामोडी, कच्च्या तेलाचे वाढते दर आणि परदेशी गुंतवणूकदारांची विक्री यांचा एकत्रित परिणाम बाजारावर दिसून आला आहे.
आजच्या व्यवहारात सेन्सेक्स तब्बल 2496.89 अंकांनी घसरून 74,207.24 अंकांवर बंद झाला. निफ्टी 50 देखील 775.65 अंकांनी घसरून 23,002.15 अंकांवर स्थिरावला. या घसरणीमुळे बीएसई मिडकॅप 150 निर्देशांकात 3 टक्क्यांची तर बीएसई स्मॉलकॅप 250 निर्देशांकात 2.6 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे.

या मोठ्या पडझडीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे तब्बल 12 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य 439 लाख कोटींवरून 427 लाख कोटींवर आले आहे. म्हणजेच एका दिवसातच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे.
शेअर बाजारातील या घसरणीमागे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मोठा प्रभाव असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाल्याने जागतिक बाजारात अनिश्चितता वाढली आहे. इराणच्या एलएनजी रिफायनरीवर झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर मिळाल्याने तणाव आणखी वाढला असून याचा थेट परिणाम गुंतवणूकदारांच्या भावनांवर झाला आहे.
कच्च्या तेलाच्या किमतींमध्येही मोठी उसळी पाहायला मिळाली असून ब्रेंट क्रूड ऑईलचे दर 118 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसा काढण्यास सुरुवात केली आहे. तेलाचे दर दीर्घकाळ उच्च पातळीवर राहिल्यास भारताच्या आर्थिक वाढीवर आणि जीडीपीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
बँकिंग क्षेत्रातील घडामोडींनीही बाजारावर दबाव आणला आहे. एचडीएफसी बँकेचे चेअरमन अतनू चक्रवर्ती यांनी राजीनामा दिल्याच्या बातमीनंतर बँकेच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये शेअरने 52 आठवड्यांचा निचांक गाठला होता. नंतर आरबीआयच्या स्पष्टीकरणानंतर काही प्रमाणात सुधारणा दिसून आली, तरीही बाजार बंद होताना एचडीएफसी बँकेचा शेअर 798.20 रुपयांवर स्थिरावला.
Atanu Chakravarty यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर बँकिंग क्षेत्रात अनिश्चितता वाढल्याचे चित्र दिसून आले आहे. याशिवाय अमेरिकन फेडरल रिझर्व्हने 18 मार्चच्या पतधोरणात व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आखाती देशांतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर व्याजदर कपात टाळण्यात आली आहे.
परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (FII) सातत्याने होत असलेल्या विक्रीमुळेही बाजारावर दबाव कायम आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 26 पैशांनी घसरून 92.6375 वर पोहोचला आहे, ज्यामुळे परकीय गुंतवणुकीवरील ताण आणखी वाढला आहे.



