जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील डी मार्ट परिसरात एका तरुणाला जुन्या वादातून आणि किरकोळ संशयावरून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आदर्श नगरमधील डी-मार्ट जवळ ही घटना घडली. याप्रकरणी सोमवारी १६ मार्च रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आकाश प्रकाश सिंदवाणी (वय २८, रा. सिंधी कॉलनी) हे १४ मार्चच्या रात्री आपल्या मित्राच्या घरून जेवण करून दुचाकीने घरी परतत होते. रात्री साधारण ३ वाजेच्या सुमारास ते भूषण हेअर सलूनजवळ लघवीसाठी थांबले असता, संशयित आरोपी विशाल पाटील, राहुल उर्फ आर.सी. चौधरी आणि ‘बबल्या’ नावाचा तरुण तिथे आले.

यावेळी तिघांनी आकाशला आडवून, “तू आयुष मनियार आणि पियुष मनियार यांना शिवीगाळ का करतो?” असा जाब विचारला. त्यानंतर काहीही ऐकून न घेता सर्वांनी मिळून आकाशला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण इतकी भीषण होती की, आरोपींनी आकाशचे दोन्ही पाय पकडून त्याला भररस्त्यात ओढत नेत बेदम मारहाण केली आहे. जखमी अवस्थेत आकाशने कसाबसा आपला जीव वाचवून घर गाठले. त्यावेळी संशयित आरोपींना आकाशच्या घरासमोर येवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आकाश सिंदवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे विशाल पाटील, राहुल उर्फ आर.सी. चौधरी आणि ‘बबल्या’ याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भुषण कोते हे करीत आहे.



