जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात ‘एसएनए विक २०२६’ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या सप्ताहात फ्रेशर्स पार्टी, विविध क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारांचे सादरीकरण करत कार्यक्रमाला रंगत आणली. स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील साम्राज्य बॅचच्या वतीने आयोजित या एसएनए विकचे उद्घाटन माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. वैभव पाटील, डॉ. प्रेमचंद पाटील, प्रमोद भिरूड, डॉ. विजय बाविस्कर, डॉ. हर्षल बोरोले, डॉ. जयवंत नागुलकर, प्राचार्या विशाखा गणवीर आणि प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत मान्यवरांनी शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

सप्ताहाच्या पहिल्या दिवशी एएनएम, जीएनएम आणि बीएससी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ‘फ्रेशो स्पार्क’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात रॅम्प वॉक, इंडियन कल्चर, बार्बी थीम, हॉलीवूड, महाराष्ट्रीयन संस्कृती, गीतगायन, नृत्य आणि नाटिका अशा विविध कलाप्रकारांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. या स्पर्धेत आयुष मोरे याची ‘मिस्टर फ्रेशर्स’ तर हर्षिता राजपूत हिची ‘मिस फ्रेशर्स’ म्हणून निवड करण्यात आली. तसेच दुर्गेश माने याने ‘मिस्टर आयकॉनिक’ आणि इशा जांगीड हिने ‘मिस आयकॉनिक’ हा किताब पटकावला. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तोष्णा घुडे, दिव्या गणवीर, शेख मेहवीश, क्रिष्ण राठोड, मुक्ता पवार आणि विकास जाधव यांनी केले. दुसऱ्या दिवशी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. क्रिकेट स्पर्धेत विद्यार्थ्यांसह प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांसह एकूण १५ संघांनी सहभाग घेतला. याशिवाय रनिंग, रिले, बॅडमिंटन, कॅरम, चेस, खो-खो आणि व्हॉलीबॉल अशा विविध स्पर्धाही पार पडल्या.
क्रीडा स्पर्धांच्या प्रारंभी राज्यस्तरीय चॅम्पियन श्रृती कालबांडे आणि पृथ्वीराज आडे यांनी मशाल परेड करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी आकाशात फुगे सोडून स्पर्धांना औपचारिक प्रारंभ केला. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत महाविद्यालयीन वातावरणात उत्साहाची रंगत निर्माण केली.
या संपूर्ण एसएनए विकच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक मिनाव खुरेजाम, प्रा. प्रियंका जगताप, कॉलेट लोंढे, मानसी ढोबळे, सचिन पवार आणि साक्षी गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले.



