बंगळुरू-वृत्तसेवा । कर्नाटक सरकारने बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयपीएल 2026 चे सामने आयोजित करण्यास परवानगी दिली आहे. 28 मार्च रोजी यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात उद्घाटनाचा सामना खेळला जाणार आहे.
कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) चे प्रवक्ते विनय मृत्युंजय यांनी सांगितले की, तज्ज्ञ समितीच्या शिफारशी आणि स्टेडियमच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर सरकारने ही परवानगी दिली.

कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी सोमवारी तज्ज्ञ समिती, KSCA, RCB आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी DNA यांच्या प्रतिनिधींशी बैठक घेतली. या बैठकीत स्टेडियममधील सुरक्षा व्यवस्था आणि आयोजनाची तयारी यावर समितीने अहवाल सादर केला.
गेल्या वर्षी RCB ने पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर स्टेडियममध्ये विजय मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी स्टेडियमबाहेर मोठी गर्दी झाल्यामुळे चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला तर 50 हून अधिक जण जखमी झाले होते.
या घटनेनंतर न्यायमूर्ती डी’कुन्हा समितीने स्टेडियमला मोठ्या आयोजनांसाठी असुरक्षित ठरवले होते. त्यामुळे ICC महिला विश्वचषक 2025 चे सामने बेंगळुरूहून हलवून नवी मुंबईत खेळवण्यात आले होते. तसेच महाराजा टी-20 ट्रॉफी स्पर्धाही म्हैसूर येथे हलवावी लागली होती.
दरम्यान, बीसीसीआयने चार दिवसांपूर्वी आयपीएल 2026 च्या सुरुवातीच्या 20 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यापैकी दोन सामने बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. हे सामने राज्य सरकारच्या परवानगीवर अवलंबून असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले होते.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु ही मागील हंगामाची विजेती संघ आहे. RCB ने मागील हंगामाच्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्सला 6 धावांनी पराभूत करून पहिल्यांदाच आयपीएल किताब जिंकला होता. त्यामुळे परंपरेनुसार या वर्षीचा उद्घाटन सामना, क्वालिफायर-2 आणि अंतिम सामना देखील बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहेत.



