अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील प्रताप महाविद्यालयाच्या वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने महाविद्यालय प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. वस्तीगृहातील अपुरी सुविधा, स्वच्छतेचा अभाव आणि विद्यार्थ्यांच्या राहणीमानाशी संबंधित अडचणी तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रतिनिधींनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव तसेच खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन नीरज अग्रवाल, संचालक योगेश मुंडळा आणि चिटणीस प्रा. पराग पाटील यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. वस्तीगृहात आवश्यक मूलभूत सुविधा अपुऱ्या असल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः स्वच्छतेचा अभाव, राहण्याची गैरसोय तसेच दैनंदिन गरजांशी संबंधित सुविधा अपुऱ्या असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर व शिक्षणावर परिणाम होत असल्याची बाब त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.

निवेदनाद्वारे वस्तीगृहातील समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच त्यांच्या राहणीमानात सुधारणा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना त्वरित करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत नेहमीच त्यांच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वासही या वेळी व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या समस्या तातडीने निकाली काढल्या नाहीत तर येत्या काळात लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
या प्रसंगी YIN अध्यक्ष कुशल घनश्याम पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष कुणाल पाटील, करण साळुंखे, विवेक निकम, गौरव सोनटके, हर्ष पाटील, समाधान चव्हाण, विशाल पाटील, तुषार पाटील, गौरव चौधरी, समीर पाटील तसेच वस्तीगृहातील अनेक विद्यार्थी उपस्थित होते.



