जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । व्यवसाय कर कायदा १९७५ अंतर्गत करपत्रक (रिटर्न) भरणे व नोंदणी प्रक्रियेदरम्यान कर सल्लागारांना येणाऱ्या विविध तांत्रिक अडचणींबाबत दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) जळगाव शाखेच्या वतीने जीएसटी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात ऑनलाइन प्रणालीतील अडचणी दूर करून कर सल्लागारांना सुलभ सेवा उपलब्ध करून देण्याची तसेच करपत्रक भरण्याची अंतिम मुदत वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.
जळगाव येथील जीएसटी कार्यालयातील जॉईंट कमिशनर अविनाश भामरे यांना हे निवेदन देण्यात आले. ICAI ही संसदेच्या कायद्याद्वारे स्थापन झालेली स्वायत्त संस्था असून देशातील अकाउंटिंग आणि ऑडिटिंग क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. देशभरातील दोन लाखांहून अधिक चार्टर्ड अकाउंटंट्सचे नियमन करणारी ही संस्था अकाउंटिंग स्टँडर्ड्सची निर्मिती, सदस्यांचे ज्ञान अद्ययावत ठेवणे तसेच सरकारला विविध आर्थिक व करसंबंधित कायद्यांबाबत मार्गदर्शन करण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहे.

व्यवसाय कर कायदा १९७५ अंतर्गत करपत्रक भरताना कर सल्लागारांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. PTRC व PTEC नोंदणीसाठी नवीन अर्ज करताना OTP निर्माण होत नसल्यामुळे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. यामुळे कर सल्लागारांसह संबंधित व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तसेच करपत्रक भरताना प्रणालीमध्ये केवळ करवर्ष २०२५-२६ दर्शविले जात असल्यामुळे मागील वर्षांचे करपत्रक भरता येत नसल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. परिणामी करदेयता जमा करण्यास अडथळे निर्माण होत असून अनेक प्रकरणांमध्ये कर भरण्याची प्रक्रिया अडकून पडत आहे.
याशिवाय करदेयतेचे चलन भरल्यानंतरही ती रक्कम रिटर्नमध्ये दिसून येत नसल्याची समस्या कर सल्लागारांनी मांडली आहे. लॉगिन करताना जुना पासवर्ड स्वीकारला जात नसल्यानेही वापरकर्त्यांना अडचणी निर्माण होत आहेत. तसेच करदेयतेच्या चलनातील चुका दुरुस्त करण्यासाठी आवश्यक असलेली ‘Rectification’ सुविधा प्रणालीमध्ये उपलब्ध नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
व्यवसाय कर कायदा नियम ११ नुसार मार्च महिन्यात नोंदणी घेतल्यास त्या महिन्याचे करपत्रक भरावे लागते आणि पुढील वर्षी वार्षिक करदेयता लागू होते. मात्र एप्रिल महिन्यात नोंदणी घेतल्यास दरमहा १२ करपत्रके भरावी लागतात. या नियमांमुळे उद्योजक आणि कर सल्लागार दोघांनाही अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे.
या सर्व बाबी मुंबई येथील आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्याची विनंती करण्यात आली असून कर सल्लागारांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून योग्य मार्गदर्शन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच व्यवसाय कर करपत्रक भरण्याची अंतिम तारीख १५ मार्च असल्याने ती वाढवून १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणीही ICAI जळगाव शाखेने केली आहे.
हे निवेदन जळगाव सीए शाखेचे उपाध्यक्ष तसेच सीए विद्यार्थी शाखा अध्यक्ष सी.ए. सोहन नेहेते आणि लॉ अँड रिप्रेझेंटेशन कमिटीचे अध्यक्ष सी.ए. आर. डी. जैन यांनी जॉईंट कमिशनर अविनाश भामरे यांना सादर केले.



