भुसावळ–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरात नाट्यरसिकांसाठी सांस्कृतिक मेजवानी ठरणारी ‘स्नेहयात्री करंडक’ राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा शनिवार, २१ मार्चपासून सुरू होत आहे. स्नेहयात्री प्रतिष्ठान, भुसावळ यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत राज्यातील विविध शहरांतील तब्बल १३ नाट्यसंस्था सहभागी होणार असून दोन दिवसांत १३ दर्जेदार एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे.
ही स्पर्धा स्व. लालचंदजी लखिचंदजी निमाणी सभागृह, श्री कृष्णचंद्र सभागृह येथे स्व. डॉ. उमेश खानापूरकर स्मृतीमंचावर पार पडणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, नाशिक आणि जळगाव येथील नाट्यसंस्था आपल्या कलाकृती सादर करणार असल्याने नाट्यप्रेमींसाठी हा एक अनोखा सांस्कृतिक उत्सव ठरणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघांना विविध मान्यवरांच्या स्मरणार्थ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यात श्री. रविंद्रजी निमाणी यांच्याकडून स्व. लालचंद लखीचंद निमाणी स्मृती सांघिक प्रथम पुरस्कार, श्री. अक्षय माधवपूरकर यांच्याकडून गुरुवर्य स्व. रुक्मिणी माधवपूरकर स्मृती सांघिक द्वितीय पुरस्कार आणि श्री. विवेक ठाकरे यांच्याकडून स्व. कलाबाई देविदास ठाकरे स्मृती सांघिक तृतीय पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनय, सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनय, सर्वोत्कृष्ट नेपथ्य आणि सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना यांसाठीही स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
शनिवार, २१ मार्च रोजी दुपारी ३ वाजता कान्हदेश कला मंच, चोपडा यांची ‘एका रात्रीचा गर्भ’ ही एकांकिका सादर होऊन स्पर्धेची सुरुवात होईल. त्यानंतर स्पॉटलाईट, नाशिक यांची ‘दो लफ्जो की कहानी’, नाट्यरंग, जळगाव यांची ‘गाईड’, इन्फिनिटी, पुणे यांची ‘पुंडलिक वरदा’ आणि व्हाईट एलिफन्ट, डोंबिवली यांची ‘ट्युलिप’ या एकांकिका सादर होतील.
रविवार, २२ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता उत्कर्ष कलाविष्कार, भुसावळ यांची ‘लॉक-अनलॉक’ या एकांकिकेने दुसऱ्या दिवसाची सुरुवात होईल. त्यानंतर वैभवदीप, सोलापूर यांची ‘प्रेम की यातना’, उत्कर्ष कलाविष्कार, भुसावळ यांची ‘माणूसघर’, नक्षत्र कलामंच, मुंबई यांची ‘पाकळ्या’, उत्तुंग मंडळ, नागपूर यांची ‘सोडचिठ्ठी’, कलासक्त, अंधेरी यांची ‘तळ्यात-मळ्यात’, ज्ञानसाधना, ठाणे यांची ‘हमको हिंदी नही आती’ आणि स्वामी नाट्यांगण, डोंबिवली यांची ‘लेटर बॉक्स नं. १४३’ या एकांकिका सादर होतील.
स्पर्धेच्या समारोप प्रसंगी सायंकाळी ७ वाजता ‘संगीत संध्या’ हा चित्रपटगीतांचा कार्यक्रम सादर होणार असून त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ पार पडेल.
या स्पर्धेसाठी रविंद्र निमाणी, चंद्रशेखर अग्रवाल, युवराज लोणारी, पिंटूभाऊ कोठारी, संदीप सुरवाडे, आनंद फडके, केदार ओक, मनोहर जाधवानी, डॉ. समीर खानापूरकर, डॉ. नितीन दावलभक्त, समीर पाटील यांचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्नेहयात्री प्रतिष्ठानचे मुकेश खपली, प्रा. डॉ. गिरीष कुलकर्णी, प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, सचिव विश्वजीत घुले, राजेंद्र जावळे, हरीश कोळी, अक्षय माधवपूरकर, संजय यावलकर, संजीवनी यावलकर, आदर्श पंडा, धनराज कुंवर, रामचंद्र डहाके, खुशाल निंबाळे, प्रदीप चौधरी, दिनेश ठाकरे, बाळा बावीस्कर, सनी बावीस्कर, राजेश पाटील आदी परिश्रम घेत आहेत.
या स्पर्धेतील सर्व एकांकिकांना प्रेक्षकांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला असून भुसावळच्या सांस्कृतिक चळवळीला चालना देण्यासाठी स्नेहयात्री प्रतिष्ठान सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती स्पर्धेचे प्रकल्प प्रमुख नारायण माळी यांनी दिली.



