Home Cities जळगाव भागवत कथेला भाविकांचा प्रतिसाद; कथाचार्य सोपानदेवजी महाराजांचे मार्गदर्शन

भागवत कथेला भाविकांचा प्रतिसाद; कथाचार्य सोपानदेवजी महाराजांचे मार्गदर्शन


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दशरथ नगर सध्या भक्तिमय स्वरांनी दुमदुमून गेले आहे. निमित्त आहे, पवन कोळी आणि समस्त कोळी परिवारातर्फे आयोजित संगीतमय श्रीमद् भागवत महापुराण कथेचे. प्रख्यात कथाचार्य काव्याणी श्री सोपानदेवजी महाराज यांच्या ओजस्वी आणि रसाळ वाणीतून वाहणाऱ्या ज्ञानगंगेचा लाभ घेण्यासाठी जळगावकर मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.

जीवनाचे तत्वज्ञान: काय शिकवते अध्यात्म?
कथेच्या ओघात महाराजांनी अत्यंत सोप्या भाषेत जीवनाचे सार उलगडले. ते म्हणाले, “भागवत मरण कसे असावे हे शिकवते, रामायण जगण्याच्या मर्यादा आखून देते, गीता जीवनाचा खरा अर्थ सांगते, तर महाभारत राजकारण शिकवते.” १८ हजार श्लोक आणि ३३५ अध्यायांमध्ये विस्तारलेल्या या महापुराणात भगवान विष्णूंच्या २४ अवतारांचे महात्म्य दडलेले असून, ही कथा भक्तांसाठी ‘कल्पवृक्षा’समान असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

सत्य आणि श्रीकृष्णाचा विजय
महाभारतातील प्रसंगांचा संदर्भ देत महाराजांनी ‘सत्ता आणि सत्य’ यावर भाष्य केले. “ज्या बाजूला भगवान श्रीकृष्ण आहेत, त्या बाजूला सत्य आहे आणि जिथे सत्य आहे, तिथे विजय निश्चित आहे,” असे सांगत त्यांनी श्रोत्यांमध्ये आत्मविश्वास फुंकला. यावेळी त्यांनी द्रौपदीचा संघर्ष आणि भीष्म पितामहांच्या भूमिकेवरही प्रकाश टाकला.

कथेची परंपरा आणि पावित्र्य
श्रीमद् भागवताची उत्पत्ती सांगताना महाराज म्हणाले की, ही कथा भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवांना सांगितली, तिथून ती नारदमुनी, व्यासमुनी आणि सुखदेवजी महाराजांमार्फत राजा परीक्षितापर्यंत पोहोचली. गंगा, यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमाचे पावित्र्य या कथेमध्ये सामावलेले आहे. मनापासून संकल्प केल्यास भागवत कथा सर्व इच्छा पूर्ण करते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

युवा पिढी आणि संतांचे कार्य
आजच्या धावपळीच्या युगात युवा पिढी मोठ्या संख्येने भक्तीमार्गाकडे वळत असल्याबद्दल महाराजांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी पंडित प्रदीप मिश्रा, बागेश्वर धाम सरकार आणि संत प्रेमानंद बाबा यांच्या आध्यात्मिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.


Protected Content

Play sound