जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील जळके येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरा’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ थेट गावपातळीवर देण्यात आला. दरम्यान, भागपूर उपसा सिंचन योजनेसाठी शासनाकडून २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची तसेच वसंतवाडी तांड्याला महसुली गावाचा दर्जा देण्यात आल्याची माहिती देताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जनतेच्या चेहऱ्यावरचे समाधान हाच आमचा खरा सन्मान असल्याचे सांगितले.
जळके येथील गजानन महाराज मंदिरासमोरील पटांगणात ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरा’चे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. शासनाच्या विविध सेवा आणि योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी, महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

या प्रसंगी शेतकरी आणि ग्रामस्थांनी भागपूर उपसा सिंचन योजनेसाठी २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल तसेच वसंतवाडी तांड्याला महसुली गावाचा दर्जा मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचेही विशेष आभार मानले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पोखरा योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच बळीराजा शेतपानंद रस्ते तयार करण्यासाठी शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. गावाच्या विकासासाठी एकजूट राखणे गरजेचे असल्याचे सांगताना त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या कष्टांचे महत्त्व अधोरेखित केले. “टायगर किंवा बॉस अशा शब्दांपेक्षा ‘मी शेतकरी आहे’ हा अभिमान प्रत्येकाने बाळगावा,” असे भावनिक प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
प्रशासनातील अधिकाऱ्यांना उद्देशून बोलताना त्यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांची एक सही एखाद्या कुटुंबाच्या भविष्यावर परिणाम करणारी असते. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजना वेळेत पोहोचवाव्यात. जिल्ह्यातील कोणताही पात्र नागरिक शासनाच्या लाभापासून वंचित राहू नये, याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
महिलांच्या सहभागाबाबत बोलताना त्यांनी जिल्ह्यातील महिला बचत गटांनी स्वावलंबनाचा आदर्श निर्माण केल्याचे सांगितले आणि त्यांना शासनाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ मिळाला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आपल्या प्रास्ताविकात राजस्व समाधान शिबिराचे महत्त्व स्पष्ट केले. शासनाच्या विविध सेवा आणि योजना नागरिकांना एकाच ठिकाणी सुलभपणे मिळाव्यात या उद्देशाने या शिबिरांचे आयोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. महसूल विभागाशी संबंधित अनेक प्रक्रिया अधिक सोप्या करण्यात आल्या असून शेती मोजणीसह इतर प्रकरणांतील अडचणी शिबिराच्या माध्यमातून तत्काळ सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच बळीराजा शेतपानंद रस्ते मोकळे करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. आयुष्यमान भारत योजना ही शासनाची महत्त्वाची योजना असून प्रत्येक पात्र नागरिकाने आयुष्यमान कार्ड काढून त्याचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी शिबिरात उभारण्यात आलेल्या विविध विभागांच्या स्टॉलना भेट देऊन नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती घेतली.
या शिबिरात विविध सेवांद्वारे मोठ्या संख्येने नागरिकांना लाभ देण्यात आला. डोमिसाईल प्रमाणपत्र २८, डिजिटल सातबारा १५६, सातबारा दुरुस्ती ३४, जात प्रमाणपत्र ६२, विविध शासकीय योजनांची DBT/DLC प्रकरणे १५०, वारस नोंदी ४२, उत्पन्न दाखले ६६, फार्मर आयडी ४६ यासह इतर सेवांमधून एकूण ६४७ लाभार्थींना लाभ देण्यात आला. शिबिरात विविध विभागांचे माहितीपर स्टॉल उभारण्यात आले होते. सुमारे ६०० ते ७०० नागरिकांनी उपस्थिती लावून शासकीय सेवा थेट गावपातळीवर घेतल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार प्राजक्ता केदार यांनी केले तर तहसीलदार शीतल राजपूत यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोढरे, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रमोद पांढरे, दूध संघाचे संचालक रमेशआप्पा पाटील, अर्जुन पाटील, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, नायब तहसीलदार डी.बी. जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट सदस्य आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



