फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर ते सावदा रोडवरील कब्रस्तानसमोर एका भरधाव दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जखमी तरुणाच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल रघुनाथ मोरे (वय २६, रा. तासखेडा, ता. रावेर) हे आपल्या दुचाकीने (क्र. एमएच १९ सीवाय २६९७) जात असताना, विरुद्ध दिशेने येणाऱ्या सुपर स्लेंडर दुचाकीने (क्र. एमएच १९ बीझेड १२७२) त्यांना जोराची धडक दिली. हा अपघात फैजपूर ते सावदा रोडवरील कब्रस्तानच्या समोर ०९ मार्च रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास घडला.

या अपघातातील संशयित आरोपी चालक तौशल चौधरी (रा. सावदा) याने आपल्या ताब्यातील वाहन अत्यंत हलगर्जीपणाने आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवले. त्याने अमोल मोरे यांच्या दुचाकीला बाजूने जोरात ठोकर दिल्याने मोरे हे रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार तौशल चौधरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



