Home प्रशासन नगरपालिका यावल नगरपरिषदेची ‘अभय योजना’; मालमत्ता कर व पाणीपट्टीवरील व्याज-दंडावर १००% सूट, २५...

यावल नगरपरिषदेची ‘अभय योजना’; मालमत्ता कर व पाणीपट्टीवरील व्याज-दंडावर १००% सूट, २५ मार्चपर्यंत संधी


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने निवासी मालमत्तांसाठी विशेष ‘अभय योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांनी थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी एकरकमी भरल्यास त्या थकबाकीवर आकारण्यात आलेल्या व्याज दंडावर १०० टक्के सूट देण्यात येणार आहे. ही योजना २५ मार्च २०२६ पर्यंत लागू राहणार असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष छाया पाटील यांनी केले आहे.

यावल नगरपरिषदेच्या नोंदीनुसार शहरातील अनेक निवासी मालमत्ताधारकांकडे मागील काही वर्षांपासून मालमत्ता कर पाणीपट्टीची थकबाकी प्रलंबित आहे. ही थकबाकी नियमित करण्यासाठी तसेच नागरिकांना आर्थिक सवलत देण्यासाठी नगरपरिषदेने ही विशेष अभय योजना राबविली आहे. या माध्यमातून थकबाकीदारांना दिलासा मिळण्यासोबतच नगरपरिषदेच्या उत्पन्नातही वाढ होऊन शहरातील विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत गवई यांनी सांगितले की, नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, सार्वजनिक प्रकाश व्यवस्था आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी कर आणि पाणीपट्टीची वेळेवर वसुली होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांना थकबाकी नियमित करण्याची संधी देण्यासाठी २५ मार्च २०२६ पर्यंत व्याज दंडावर १०० टक्के सूट देणारी अभय योजना राबविण्यात आली आहे. नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत आपली थकबाकी एकरकमी भरावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना त्यांनी असेही सांगितले की, ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला नाही त्यांच्यावर पुढील काळात नियमानुसार वसुलीची कडक कारवाई करण्यात येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी शेवटच्या क्षणाची वाट पाहता तात्काळ नगरपरिषद कार्यालयात किंवा संबंधित विभागात जाऊन थकीत कर भरावा आणि व्याज दंडमाफीचा लाभ घ्यावा.

दरम्यान, यावल नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील यांनीही शहरातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील असून नागरिकांना आर्थिक दिलासा देण्याच्या उद्देशाने ही अभय योजना सुरू करण्यात आली आहे. व्याज आणि दंडावर १०० टक्के सूट ही मोठी संधी असल्याने शहरातील सर्व निवासी मालमत्ताधारकांनी २५ मार्च २०२६ पूर्वी आपला कर एकरकमी भरावा आणि शहराच्या विकासात आपला सहभाग नोंदवावा, असे त्यांनी सांगितले.

यावल शहर अधिक स्वच्छ, सुबक आणि विकसित करण्यासाठी नागरिकांनी नगरपरिषदेच्या उपक्रमांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या अभय योजनेमुळे थकीत कराची वसुली वाढण्यासोबतच शहरातील विकासकामांना आर्थिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound