रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील उटखेडा गावात दोन गटांमध्ये झालेल्या तीव्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची घटना घडली असून या प्रकारामुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या असून एकूण ३१ जणांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या गुन्ह्यात राहुल अरुण तायडे यांनी रावेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीत त्यांनी नमूद केले आहे की, त्यांचे चुलत भाऊ किशोर तायडे यांच्या मोटारसायकलला रोहित संतोष तायडे यांनी कट मारल्याच्या कारणावरून दोन्ही गटांत वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले. या घटनेत मारहाण व गोंधळ घालत गंभीर प्रकार घडल्याचा आरोप करत राहुल तायडे यांच्या तक्रारीवरून १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दुसऱ्या बाजूने मयुरी राहुल तायडे यांनी देखील स्वतंत्र फिर्याद नोंदवली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पूर्वी दाखल झालेला केस मागे घेण्याच्या कारणावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातूनच हाणामारी झाली. या प्रकरणात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही तक्रारींमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दक्षता घेतली आहे.
या हाणामारीत राहुल तायडे, अरुण तायडे, किशोर तायडे, लाडकाबाई सोनवणे, मयुरी तायडे, संतोष तायडे आणि अविनाश झाल्टे यांच्यासह एकूण आठ जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार सिकंदर तडवी करीत आहेत.



