Home क्राईम ट्रॅक्टर ट्रॉली उलटून भीषण अपघात; मजुराचा मृत्यू, दोघे जखमी

ट्रॅक्टर ट्रॉली उलटून भीषण अपघात; मजुराचा मृत्यू, दोघे जखमी


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल-चोपडा मार्गावरील वढोदा गावाजवळ ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा एंगल तुटून ट्रॉली उलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एका परप्रांतीय मजुराचा जागीच मृत्यू झाला असून दोन मजूर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साकळीहून यावलच्या दिशेने लोखंडी पाईपांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली येत होती. या ट्रॉलीमध्ये बोरींगचे काम करणारे काही मजूरही बसलेले होते. ट्रॉली वढोदा गावाजवळ पोहोचताच अचानक ट्रॉलीचा एंगल तुटल्याने ट्रॉली उलटली आणि मोठा अपघात झाला.

या अपघातात मुनुसिंग अबालसिंग चव्हाण (वय ५५, रा. थाना दरियागंज, जि. कासगंज, उत्तरप्रदेश) हा बोरींगचे काम करणारा मजूर लोखंडी पाईपांखाली दबला गेल्याने गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर मुकेशसिंग चव्हाण आणि रामजी श्रीवास्तव हे दोघे मजूर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मृत मजुराचे शवविच्छेदन यावल येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.

या संदर्भात मयताचा लहान भाऊ संजयसिंग अबालसिंग चव्हाण (वय ४३) यांनी यावल पोलीस ठाण्यात अपघाताची खबर दिल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहेत.


Protected Content

Play sound