Home प्रशासन डॉ. हेडगेवार चौक ते पोलिस स्टेशन रस्ता ‘नो हॉकर्स झोन’ करा –...

डॉ. हेडगेवार चौक ते पोलिस स्टेशन रस्ता ‘नो हॉकर्स झोन’ करा – माजी नगरसेवक यशवंत दलाल  


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातील डॉ. हेडगेवार चौक ते पोलिस स्टेशनदरम्यान असलेल्या मुख्य रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर हा संपूर्ण रस्ता ‘नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित करावा, अशी मागणी माजी नगरसेवक तथा भाजप तालुका उपाध्यक्ष यशवंत दलाल यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नगरपालिकेला लेखी निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महालक्ष्मी मंदिरासमोरून जाणारा हा रस्ता शहरातील अत्यंत महत्त्वाचा वर्दळीचा मार्ग मानला जातो. मात्र या मार्गावर मोठ्या प्रमाणात फेरीवाले, लोटगाड्या आणि अनधिकृत दुकाने उभी राहत असल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. याशिवाय अनेक वाहनचालक रस्त्याच्या कडेला वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

विशेषतः विद्यार्थिनी, महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना या रस्त्यावरून चालताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनींना जीव मुठीत धरून या मार्गाने जावे लागते, अशी स्थिती निर्माण झाली असल्याचे माजी नगरसेवक यशवंत दलाल यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा रस्ता ‘नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या संदर्भात यापूर्वीही स्थानिक पातळीवर चर्चा झाली होती. या समस्येबाबत ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर शहरात या विषयावर मोठी चर्चा रंगली. त्यानंतर यशवंत दलाल यांनी पुढाकार घेत नगरपालिकेला अधिकृत निवेदन देत हा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे.

दलाल यांनी सुचविले आहे की, या रस्त्यावर असलेले फेरीवाले, लोटगाड्या आणि छोटे दुकानदार यांना पूर्णपणे हटविण्याऐवजी नगरपालिकेने त्यांच्यासाठी पर्यायी जागा निश्चित करावी. शहरातील इतर ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने त्यांची व्यवस्था केल्यास वाहतुकीची समस्या कमी होईल आणि व्यापाऱ्यांनाही अडचण येणार नाही, असे त्यांनी नमूद केले.

या मागणीमुळे आता नगरपालिकेवर योग्य निर्णय घेण्याचा दबाव निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, रावेर शहरातील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने या समस्येवर नगरपालिकेने कोणती भूमिका घेतली जाणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound