जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्याच पेशींवर हल्ला करणाऱ्या ‘सिस्टेमिक ल्युपस एरिथेमॅटोसस’ या गंभीर आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी जळगाव शहरातील महादेव हॉस्पिटल येथे विशेष वैद्यकीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. गुरुवार, 12 मार्च रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांनी ल्युपस या आजाराचे स्वरूप, लक्षणे आणि आधुनिक उपचार पद्धतींबाबत सखोल मार्गदर्शन केले.
या परिसंवादात संधिवात तज्ज्ञ डॉ. आस्था अग्रवाल आणि ग्रंथीशास्त्र तज्ज्ञ डॉ. चिमु चिंते यांनी उपस्थित डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधी आणि नागरिकांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, ‘सिस्टेमिक ल्युपस एरिथेमॅटोसस’ हा एक ‘ऑटोइम्यून’ प्रकारचा आजार असून यामध्ये शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चुकून स्वतःच्या निरोगी पेशींवरच हल्ला करू लागते. साध्या भाषेत सांगायचे झाल्यास शरीराची सुरक्षा यंत्रणा स्वतःच्या अवयवांनाच शत्रू समजून त्यांच्यावर प्रहार करते.

तज्ज्ञांच्या मते हा आजार ‘सिस्टेमिक’ स्वरूपाचा असल्यामुळे त्याचा परिणाम शरीरातील अनेक अवयवांवर होऊ शकतो. त्वचा, सांधे, मूत्रपिंड, हृदय तसेच मेंदू यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर या आजाराचा प्रभाव पडण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळेत निदान आणि योग्य उपचार अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
ल्युपस या आजाराची ओळख पटविण्यासाठी काही महत्त्वाची लक्षणेही त्यांनी सांगितली. नाकाच्या पुलावर आणि दोन्ही गालांवर फुलपाखरासारखा लाल पुरळ दिसणे, सांध्यांमध्ये सूज येणे, सकाळी उठल्यावर सांधे जखडल्यासारखे वाटणे, विश्रांती घेतल्यानंतरही न जाणारा तीव्र थकवा आणि ताप, सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर पुरळ येणे तसेच थंडीमुळे हात-पायांच्या बोटांचा रंग पांढरा किंवा निळा पडणे ही काही लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे डॉक्टरांनी सांगितले.
ल्युपस होण्याची नेमकी कारणे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नसली तरी अनुवांशिक घटक यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. विशेष म्हणजे या आजाराचे सुमारे 90 टक्के रुग्ण महिला असतात. स्त्रियांमध्ये ‘इस्ट्रोजेन’ या हार्मोनचा प्रभाव यामागे एक महत्त्वाचा घटक मानला जातो. याशिवाय अतिनील किरणे, संसर्ग किंवा काही औषधांमुळेही हा आजार बळावण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
तथापि, वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या आधुनिक प्रगतीमुळे आजच्या घडीला केवळ लक्षणे कमी करणे हेच उद्दिष्ट राहिलेले नाही, तर योग्य उपचारांद्वारे हा आजार नियंत्रणात ठेवणे शक्य झाले आहे. नियमित तपासणी, योग्य औषधोपचार आणि जीवनशैलीत बदल केल्यास रुग्ण सामान्य जीवन जगू शकतात, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास डॉ. सी. ए. कांते, डॉ. विनोद बाविस्कर, डॉ. सी. डी. सारंग, डॉ. रविंद्र पाटील, डॉ. तेजस खैरनार, डॉ. ओमप्रकाश काकडे, डॉ. आसावरी देशपांडे, डॉ. ऋषभ पाटील, डॉ. ललित कुमार, डॉ. स्वानंद झंवर आणि डॉ. रोहित कोळी यांच्यासह शहरातील अनेक नामवंत डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



