Home Cities पाचोरा विहीरीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह ; रेल्वे तिकिटावरून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू

विहीरीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह ; रेल्वे तिकिटावरून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू


पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक शिवारात एका विहिरीत अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक येथे डॉ. विशाल पाटील यांच्या शेतातील विहिरीत १३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास एका अनोळखी इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत तरंगताना दिसून आला. शेतात काम करणाऱ्या काही नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर तातडीने याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल मनोहर पाटील हे रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची अवस्था अत्यंत कुजलेली असल्याने तो काही दिवसांपूर्वीच विहिरीत पडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी पंचनामा करताना मृताजवळून नाशिकरोड ते मुजफ्फरपूर या मार्गाचे ११ मार्च रोजी नाशिकरोड येथून काढलेले रेल्वे तिकीट आढळून आले आहे. या तिकिटाच्या आधारे पोलिसांकडून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बांबरूड-कुरंगी जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली व मदतकार्य केले. घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची गर्दी झाली होती. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत तपास सुरू ठेवला आहे.

या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत व्यक्तीची ओळख पटविणे आणि मृत्यूमागील नेमके कारण शोधणे यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


Protected Content

Play sound