जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “निरोगी शरीर आणि शांत मन” ही आजच्या काळाची गरज बनली आहे. आपला संसार आणि परिवार सांभाळून समाजाला योगाच्या माध्यमातून आरोग्यसंपन्न करणाऱ्या महिला खऱ्या अर्थाने समाजस्वास्थ्याच्या आधारस्तंभ आहेत. अशाच योग क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र योगशिक्षक संघ, जळगाव जिल्हा समितीच्या वतीने ‘योगिनी पुरस्कार २०२६’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला हा सोहळा १९ मार्च २०२६, गुरुवार म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पार पडणार आहे. जळगाव येथील मु. जे. महाविद्यालयातील ‘आनंदयात्री योग हॉल’ (सोहम योग विभाग) येथे दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम संपन्न होईल.

या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे, केवळ महिलांचाच नव्हे तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या त्यांच्या परिवाराचाही सहपरिवार सत्कार करण्यात येणार आहे. योग शिक्षिकांच्या कष्टामुळे केवळ त्यांचे कुटुंबच नव्हे, तर पर्यायाने संपूर्ण देशाचे आरोग्य अबाधित राहण्यास मदत होत आहे, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षा प्रा. चित्रा महाजन, महासचिव श्री. पांडुरंग सोनार आणि कोषाध्यक्ष सौ. नूतन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. या सोहळ्याबाबत अधिक माहितीसाठी रोहन चौधरी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



