Home प्रशासन रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेल्या झाडांच्या फांद्या धोकादायक ; छाटणीची मागणी

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेल्या झाडांच्या फांद्या धोकादायक ; छाटणीची मागणी


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल ते दहिगाव–सौखेडा सिम मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या फांद्यांचा फटका बसण्याची शक्यता असल्याने गंभीर दुखापतीचा धोका वाढला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या धोकादायक फांद्यांची छाटणी करावी, अशी मागणी नागरिक प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे.

यावल ते दहिगाव–सौखेडा सिम या मार्गावर सुमारे सहा ते सात किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर वृक्ष आहेत. या वृक्षांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात वाढून रस्त्यावर झुकल्या असल्याने रस्ता अरुंद झाल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी या मार्गावरून धावणाऱ्या वाहनांना तसेच एसटी बसला मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विशेषतः बसमधील खिडकीजवळ बसलेल्या प्रवाशांना या झाडांच्या फांद्या थेट बसला लागून फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक वेळा बसच्या खिडकीतून आत येणाऱ्या फांद्यांमुळे प्रवाशांना दुखापत होण्याचे प्रकार घडत असल्याची माहिती स्थानिकांकडून दिली जात आहे. त्यामुळे हा मार्ग प्रवाशांसाठी धोकादायक ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या परिस्थितीमुळे भविष्यात एखादी मोठी अप्रिय घटना घडण्याची भीतीही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ पाहणी करून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी, अशी मागणी प्रवासी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, या मार्गावरून दररोज अनेक नागरिक, शेतकरी तसेच विद्यार्थी प्रवास करत असतात. त्यामुळे रस्त्याची सुरक्षितता सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा प्रवासी बांधवांकडून व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound