रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातील महालक्ष्मी मंदिर परिसरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंगमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः विद्यार्थिनी, महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना या मार्गाने ये-जा करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे या गंभीर समस्येकडे नगरपरिषद प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
शहरातील डॉ. हेडगेवार चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या महालक्ष्मी मंदिरासमोरून जाणारा रस्ता जुने रावेर आणि नवीन रावेर शहराला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. या रस्त्यावर अनेक व्यापारी आस्थापने, मंदिर परिसर तसेच दैनंदिन वर्दळ असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र काही वाहनधारकांकडून रस्त्याच्या मध्यभागी किंवा कडेला बेशिस्त पद्धतीने वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

या मार्गाचा वापर महात्मा फुले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हनुमान व्यायाम चौक, मेन रोड, रथ गल्ली, थडा मारुती परिसर, संभाजी महाराज चौक, गांधी चौक, अपु गल्ली, बाविशे गल्ली, नेमाडे प्लॉट परिसर तसेच वाणी गल्ली येथील मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दररोज शिक्षणासाठी करत असतात. शाळा आणि महाविद्यालयीन वेळेत या रस्त्यावर विद्यार्थ्यांची गर्दी वाढत असल्याने अतिक्रमण आणि पार्किंगमुळे त्यांना सुरक्षितपणे मार्ग काढणे कठीण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तसेच अनेक महिला आणि वयोवृद्ध नागरिक देखील दैनंदिन कामांसाठी याच मार्गाने प्रवास करतात. मात्र रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे त्यांना बाजूने वाकून किंवा गर्दीतून मार्ग काढावा लागत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा याबाबत तक्रारी केल्या असतानाही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान या मार्गावर वाढत चाललेले अतिक्रमण भविष्यात मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकते, अशी भीतीही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नगराध्यक्षा संगीता महाजन आणि मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे यांनी या समस्येची गंभीर दखल घेऊन अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवावी तसेच बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



