भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील बहुतांश 33/11 केव्ही उपकेंद्रांअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये कृषी पंपांसाठी सलग दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आला असला, तरी वडजी सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये अद्यापही हा पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. त्यामुळे रब्बी हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारीपर्यंत दिवसा वीजपुरवठा सुरू न केल्यास वडजी सबस्टेशनवर शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे भडगाव तालुकाप्रमुख सुधाकर पाटील यांनी दिला आहे.
तालुक्यातील सर्व 33/11 उपकेंद्रांअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये शेतीपंपांसाठी दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र वडजी सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये अद्यापही हा पुरवठा सुरू करण्यात आलेला नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. गेल्या चार महिन्यांपासून याबाबत महावितरणकडे सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे सुधाकर पाटील यांनी सांगितले. मात्र महावितरण तसेच संबंधित ठेकेदारांकडून याबाबत वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नांतून वडजी सबस्टेशन येथे 5 एमव्हीए क्षमतेचा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. त्यामुळे इतर सबस्टेशनप्रमाणेच या भागातही शेतीपंपांसाठी सलग दिवसा वीजपुरवठा करणे महावितरणला शक्य असल्याचे सांगितले जात आहे. तरीदेखील आवश्यक कामे पूर्ण करण्यात महावितरणकडून दिरंगाई होत असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.
याबाबत शेतकऱ्यांनी सुमारे दीड महिन्यापूर्वी आमदार किशोर पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावेळी महावितरणच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी पुढील १५ दिवसांत काम पूर्ण करून दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र दीड महिना उलटूनही प्रत्यक्षात काम पूर्ण झाले नसल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटू लागला आहे.
सध्या शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी द्यावे लागत असून या परिसरात बिबट्याची दहशत असल्याने जीव धोक्यात घालून सिंचन करावे लागत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात भीती आणि असंतोषाचे वातावरण आहे. याची गंभीर दखल घेऊन सोमवारीपर्यंत आवश्यक कामे पूर्ण करून दिवसा वीजपुरवठा सुरू करावा, अन्यथा वडजी सबस्टेशनवर शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधाकर पाटील यांनी महावितरणला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
या वेळी तालुकाप्रमुख सुधाकर पाटील यांच्यासह विधानक्षेत्रप्रमुख स्वप्निल पाटील, वडजीचे उपसरपंच भाऊसाहेब परदेशी, रविंद्र पाटील आदी उपस्थित होते. महावितरणने इतर सबस्टेशनप्रमाणेच वडजी सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमध्येही तातडीने दिवसा वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे.



