Home आरोग्य एचपीव्ही लसीकरणाला अल्प प्रतिसाद ; तीन दिवसांत केवळ १३७ मुलींना लस 

एचपीव्ही लसीकरणाला अल्प प्रतिसाद ; तीन दिवसांत केवळ १३७ मुलींना लस 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महिलांमध्ये वाढत चाललेल्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेला जळगाव जिल्ह्यात अत्यंत मंद प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात मार्चपासून ४९ केंद्रांवर लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली असली तरी पहिल्या तीन दिवसांत केवळ १३७ मुलींना ही लस देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सुमारे ३१ हजार मुलींना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्याच्या तुलनेत प्रतिसाद अत्यल्प असल्याने आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे.

देशात सध्या महिलांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने वयाची १४ वर्षे पूर्ण झालेल्या आणि १५ वर्षांच्या आतील मुलींना एचपीव्ही लस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेचा शुभारंभ जळगाव जिल्ह्यात मार्च रोजी करण्यात आला असून जिल्ह्यातील ४९ लसीकरण केंद्रांवर ही मोहीम सुरू आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, ते १० मार्च या तीन दिवसांत जिल्ह्यात फक्त १३७ मुलींना एचपीव्ही लस देण्यात आली. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला असून काही ठिकाणी लसीकरणाची संख्या अत्यल्प असल्याचे दिसून आले आहे. यावरून गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबाबत तसेच त्यावरील लसीकरणाबाबत पालकांमध्ये अद्याप पुरेशी जागरूकता नसल्याचे स्पष्ट होत आहे.

या लसीचे नाव ‘गार्डासील’ असून ती हातात एकच डोस स्वरूपात दिली जाते. तज्ज्ञांच्या मते, वयाच्या १४ ते १५ वर्षांच्या कालावधीत दिलेला हा डोस अधिक प्रभावी ठरतो आणि भविष्यात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करण्यात मदत करतो. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने या लसीकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये या लसीची किंमत साधारणपणे तीन ते चार हजार रुपये असल्याचे सांगितले जाते. मात्र शासनाकडून ही लस पूर्णपणे मोफत दिली जात असूनही पालकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची खंत आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवता पालकांनी पुढाकार घेऊन मुलींचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी केले आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारी पाहता जामनेर तालुक्यात सर्वाधिक ७७ मुलींना लस देण्यात आली आहे. जळगाव तालुक्यात २०, भडगाव पारोळा येथे प्रत्येकी ७, भुसावळ चाळीसगाव येथे प्रत्येकी ६, यावल एरंडोल येथे प्रत्येकी ५, पाचोरा येथे आणि रावेर येथे मुलीचे लसीकरण करण्यात आले आहे. अमळनेरमध्ये अद्याप एकाही मुलीला लस देण्यात आलेली नाही.

दरम्यान, बोदवड, चोपडा, धरणगाव आणि मुक्ताईनगर या तालुक्यांतील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अद्याप लसीकरण मोहिमेला सुरुवात झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३१ हजार मुलींना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य विभागास मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी लागणार आहे.

गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी एचपीव्ही लसीकरण अत्यंत प्रभावी मानले जाते. त्यामुळे पालकांनी जागरूकता दाखवत आपल्या मुलींना लस देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागानेही लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी जनजागृती मोहीम अधिक तीव्र करण्याची गरज व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound