जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या वतीने थकबाकीदारांकडून कर वसुली वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या शास्ती माफी अभय योजनेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ५ मार्च ते १९ मार्च या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या योजनेदरम्यान आतापर्यंत सुमारे ३ कोटी २४ लाख रुपयांची वसुली झाली असून थकबाकीदारांवर कारवाईही सुरू करण्यात आली आहे.
महानगरपालिकेने कर न भरणाऱ्या मिळकतधारकांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. योजनेच्या पहिल्या पाच दिवसांत तब्बल १३० थकबाकीदारांचे पाणीपुरवठ्याचे नळ कनेक्शन तोडण्यात आले आहे. तसेच सुमारे २३०० थकबाकीदार मिळकतधारकांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा यासाठी मनपाकडून विशेष वसुली पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत सर्व शनिवार, रविवार तसेच शासकीय सुट्यांच्या दिवशीही वसुलीची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुट्टीच्या दिवशी दुपारी १ वाजेपर्यंत कर भरण्यासाठी भरणा काउंटर सुरू ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
कर थकवणाऱ्या मिळकतींवर कठोर कारवाई करण्याचे संकेतही प्रशासनाने दिले आहेत. कर न भरणाऱ्या मिळकतधारकांचे नळ कनेक्शन तोडणे, मालमत्ता जप्त करणे तसेच अटकबवणीसारख्या कारवाया करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत. महानगरपालिकेच्या आर्थिक हितासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची असल्याने कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
शास्ती माफी अभय योजना लागू झाल्यापासून म्हणजेच ५ मार्चपासून प्रभागनिहाय भरण्याची आकडेवारीही समोर आली आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये १ कोटी ५४ हजार रुपये, प्रभाग क्रमांक २ मध्ये ६३ लाख ६९ हजार रुपये, प्रभाग क्रमांक ३ मध्ये १ कोटी १४ लाख ६५ हजार रुपये तर प्रभाग क्रमांक ४ मध्ये ४५ लाख १३ हजार रुपये असा एकूण ३ कोटी २४ लाख १ हजार रुपयांचा भरणा करण्यात आला आहे.
मंगळवार, १० मार्च रोजीही मोठ्या प्रमाणात भरणा करण्यात आला. या दिवशी प्रभाग क्रमांक १ मध्ये १७ लाख ९३ हजार रुपये, प्रभाग क्रमांक २ मध्ये १२ लाख ३ हजार रुपये, प्रभाग क्रमांक ३ मध्ये ३० लाख २० हजार रुपये तर प्रभाग क्रमांक ४ मध्ये ५ लाख ८८ हजार रुपये असा एकूण ६० लाख ४ हजार रुपयांचा कर भरणा करण्यात आला.
एकूणच, शास्ती माफी अभय योजनेच्या माध्यमातून थकबाकी वसुलीचा वेग वाढला असून नागरिकांनीही या योजनेचा लाभ घेऊन कर भरणा करण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.



