जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिरसोली रोडवरील महानगरपालिकेच्या मालकीच्या सुमारे १३ एकर शासकीय जागेवरील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय अखेर प्रशासनाने घेतला असून येत्या चार दिवसांत मोठी कारवाई होणार आहे. महापौर दीपमाला काळे यांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला पोलीस बंदोबस्तात ही कारवाई तातडीने पूर्ण करण्याचे कडक आदेश दिले आहेत. त्यामुळे स्लॉटर हाऊस परिसरातील अनधिकृत झोपड्यांवर मनपाचा बुलडोझर चालण्याची तयारी सुरू झाली आहे.
मोहाडी रस्त्यालगत गट क्रमांक ६० मधील सुमारे ५ हेक्टर ४ आर म्हणजेच जवळपास १३ एकर क्षेत्रफळाची ही जागा महानगरपालिकेच्या मालकीची असून ती ‘स्लॉटर हाऊस’ म्हणून ओळखली जाते. पूर्वी या ठिकाणी कत्तलखाना कार्यरत होता. काही वर्षांपूर्वी महानगरपालिकेने ही जागा अटलांटा कंपनीला वापरण्यासाठी दिली होती. मात्र कालांतराने ही जागा रिकामी राहिल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीधारकांनी अनधिकृत अतिक्रमण करून आपले निवासस्थान उभारले.

महानगरपालिकेच्या या मौल्यवान जागेवर वाढलेल्या अतिक्रमणांमुळे शहराच्या विकासकामांमध्ये अडथळा निर्माण होत असल्याचे प्रशासनाचे मत आहे. या जागेचा भविष्यात विकास करून शहरासाठी विविध सुविधा उभारण्याचा मनपा प्रशासनाचा मानस असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह परिसराची पाहणी केली होती.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून झोपडपट्टीधारकांना यापूर्वीच अतिक्रमण हटविण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र संबंधितांनी स्वखुशीने अतिक्रमण काढून घेतले नाही. त्यामुळे प्रशासनाने आता कठोर भूमिका घेत थेट कारवाईचा निर्णय घेतला आहे. महापौरांच्या आदेशानुसार पुढील चार दिवसांत पोलीस बंदोबस्तात मोठी मोहीम राबवून संपूर्ण परिसर अतिक्रमणमुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून या ठिकाणी उभारण्यात आलेल्या झोपड्या आणि इतर अनधिकृत बांधकामे हटविण्यात येणार असून संपूर्ण १३ एकर जागा रिकामी करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे भविष्यात या जागेचा नियोजनबद्ध विकास करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.



