Home Cities जळगाव ई-चलन रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी रिक्षा युनियने निवेदन ; आंदोलनाचा इशारा

ई-चलन रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी रिक्षा युनियने निवेदन ; आंदोलनाचा इशारा


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ई-चलन प्रणालीतील त्रुटी, पार्किंगच्या सोयींचा अभाव आणि वाहन तपासणीच्या नावाखाली होणारी वाहनधारकांची लूट थांबवण्यासाठी ‘वीर सावरकर रिक्षा युनियन’ने आक्रमक पवित्रा घेतला आहे. युनियनचे जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

कालबाह्य ई-चलने रद्द करण्याची मागणी :
निवेदनात प्रामुख्याने ई-चलन प्रणालीवर बोट ठेवण्यात आले आहे. “भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम ५१९ आणि ५१४ नुसार, ज्या गुन्ह्यांना फक्त दंडाची शिक्षा आहे, त्यांची मर्यादा ६ महिने असते. त्यामुळे ६ महिन्यांपेक्षा जुनी सर्व चलने सरसकट रद्द करावीत,” अशी मागणी युनियनने केली आहे. तसेच, मोबाईलद्वारे फोटो काढून पाठवलेली चुकीची चलने, लायसन्स नंबर नसलेली चलने आणि दंड भरूनही पोर्टलवर प्रलंबित दिसणाऱ्या चलनांमुळे चालकांची छळवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शासकीय नियमांकडे वेधले लक्ष :
केंद्रीय मोटार वाहन नियमाप्रमाणे ज्या वाहनांना ८० किमी प्रतितास वेग मर्यादा प्रमाणपत्र दिले आहे, त्यांच्यावरील ओव्हरस्पीडचे गुन्हे रद्द करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. “खासगी बसेससाठी शहरात अधिकृत पार्किंग उपलब्ध नाही, तरीही त्यांच्यावर नो-पार्किंगचे गुन्हे दाखल केले जातात, हे अन्यायकारक आहे,” असे दिलीप सपकाळे यांनी यावेळी नमूद केले.

भ्रष्टाचार आणि सुविधांचा अभाव :
रस्त्यावर पोलीस कर्मचारी आणि बेकायदेशीर नियुक्त सहाय्यक कर्मचारी दंड वसुलीच्या नावाखाली चालकांना धमकावून भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. दंड वसुली हा महसूल जमा करण्याचा मार्ग नसून ती एक सुधारणा प्रक्रिया असावी, असे युनियनचे म्हणणे आहे. याशिवाय महामार्ग, MIDC आणि बाजार समिती परिसरात वाहनधारकांसाठी पार्किंग, टॉयलेट, विश्रांतीगृह आणि गॅरेज यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवण्याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

उपस्थित पदाधिकारी :
याप्रसंगी वाल्मिक सपकाळे, संजय अडकमोल, रमेश सोनार, भास्कर ठाकरे, सुरज पाटील, शांताराम पाटील, बाळू पाटील, किरण पाटील, संजय चौधरी यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील रिक्षा चालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युनियनतर्फे देण्यात आला आहे.


Protected Content

Play sound