Home बुलढाणा उन्हाचा पारा ४० पार ; टरबूजाला ‘अच्छे दिन’ ; विक्रीसाठी शेतकरी थेट...

उन्हाचा पारा ४० पार ; टरबूजाला ‘अच्छे दिन’ ; विक्रीसाठी शेतकरी थेट शहरात  दाखल


बुलढाणा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विदर्भात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे जात आहे. कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले असले तरी दुसरीकडे टरबूज (कलिंगड) उत्पादक शेतकऱ्यांसाठी मात्र हा हंगाम फायदेशीर ठरत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी आता थेट शहरात येऊन टरबूजाची विक्री करत असल्याने त्यांना चांगला नफा मिळत आहे.

उन्हाळ्याची तीव्रता वाढताच बाजारात गोड व रसाळ टरबूजाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा फायदा घेत खामगाव परिसरातील अनेक शेतकरी पहाटेच आपल्या शेतातील टरबूज बैलगाडी किंवा छोट्या वाहनांमधून शहरात आणत आहेत. दलालांच्या माध्यमातून विक्री करण्याऐवजी थेट ग्राहकांना फळ विकल्याने शेतकऱ्यांच्या हातात अधिक पैसा मिळत असल्याचे दिसून येत आहे.

सध्या एका बैलगाडीत साधारणपणे पाच क्विंटल टरबूज शहरात आणले जात आहे. एका गाडीत अंदाजे २०० ते ३०० टरबूजाची फळे असतात. शहरातील विविध भागांत रस्त्याच्या कडेला किंवा बाजारपेठेत ही फळे विक्रीसाठी ठेवली जात आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकही मोठ्या प्रमाणात टरबूज खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांची विक्री झपाट्याने होत आहे.

बाजारात सध्या टरबूजाला चांगला दर मिळत असून ३० ते ४० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. थेट ग्राहकांपर्यंत पोहोचल्यामुळे वाहतूक खर्च वगळता शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत असल्याचे शेतकरी अनिल म्हात्रे यांनी सांगितले. त्यांच्या मते, उन्हाळा वाढत गेल्यास पुढील काही आठवड्यांत टरबूजाची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी स्वतःच्या मेहनतीने पिकवलेले टरबूज थेट शहरात आणून विकत असल्याने ग्राहकांनाही ताजे व गोड फळ मिळत आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही याचा फायदा होत असल्याचे चित्र सध्या खामगाव परिसरात पाहायला मिळत आहे.


Protected Content

Play sound