
चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विमा कंपनीकडून ५० लाख रुपयांची रक्कम हडपण्यासाठी मृत व्यक्तीचा पुन्हा अपघात घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात उघडकीस आला आहे. या संपूर्ण कटात मृताच्या नातेवाईकांसह शासकीय डॉक्टर आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ९ जणांना अटक केली असून तब्बल साडेसात कोटींच्या संभाव्य घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
राजेंद्र शालिंदर जाधव नावाच्या व्यक्तीचा १९ एप्रिल २०२५ रोजी दहिवद फाट्यावर ‘थार’ गाडीच्या धडकेत अपघाती मृत्यू झाल्याचा दावा करत, त्यांची पत्नी अरुणा जाधव यांनी श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडे ५० लाखांच्या विम्याचा दावा केला होता. मेहुनबारे पोलीस ठाण्यात तसा अपघाताचा दाखल करण्यात आला होता. चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी चक्क मृतदेह समोर नसतानाही शवविच्छेदन अहवाल दिला होता.
डिटेक्टिव्ह एजन्सीच्या तपासात उडाला थरकाप:
विमा कंपनीला संशय आल्याने त्यांनी एका खाजगी डिटेक्टिव्ह एजन्सीमार्फत चौकशी केली. तपासात समोर आले की, राजेंद्र जाधव यांचा प्रत्यक्षात मृत्यू २३ फेब्रुवारी २०२४ रोजीच यकृताच्या आजाराने झाला होता. धक्कादायक म्हणजे, त्यांच्या घरातील फोटोवरही मृत्यूची हीच तारीख नमूद होती. ग्रामपंचायतीत मृत्यूची नोंद नसल्याचे आणि जाधव यांच्या नावावर इतर १० विमा कंपन्यांकडूनही पॉलिसी घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले.
डॉक्टर, पोलीस आणि एजंटांचे साटेलोटे:
या बनावट अपघाताचा कट रचण्यासाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी मंदार करंबळेकर, मेहुनबारे आणि चाळीसगाव पोलीस ठाण्यातील कर्मचारी महेंद्र पाटील, सुनील निकम, रवींद्र बत्तीसे, सचिन निकम यांनी मदत केल्याचे उघड झाले आहे. तसेच विमा एजंट प्रवीण पाटील, प्रेम पाटील आणि मृताचा भाऊ मिथुन जाधव यांचाही यात समावेश आहे.
पोलिस अधीक्षकांचा कडक पवित्रा:
जळगावचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने वेगवेगळ्या विमा कंपन्यांकडून सुमारे साडेसात कोटी रुपये हडपण्याचा कट रचला होता. सध्या ९ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. या घटनेमुळे शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार आणि विमा फसवणुकीचे मोठे रॅकेट समोर आले आहे.



