Home Cities भडगाव वडिलांचे स्वप्न साकार; सिद्धांत शार्दुलचे अबॅकसमध्ये मोठे यश

वडिलांचे स्वप्न साकार; सिद्धांत शार्दुलचे अबॅकसमध्ये मोठे यश


भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, याचे ज्वलंत उदाहरण भडगाव येथील सिद्धांत शार्दुल याने घालून दिले आहे. अबॅकससारख्या कठीण गणितीय कौशल्याच्या क्षेत्रात त्याने आठही लेव्हल्स यशस्वीरीत्या पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याच्या या यशामुळे भडगाव तालुक्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून त्याने आपल्या वडिलांचे स्वप्न साकार केल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

सिद्धांतने अबॅकसच्या पहिल्या लेव्हलला प्रवेश घेतल्यापासूनच गणित विषयाबद्दल त्याची विशेष आवड दिसून आली होती. पहिली लेव्हल पूर्ण करून मिळालेली ट्रॉफी पाहून त्याचे वडील अत्यंत आनंदित झाले होते. त्यांनीच अबॅकस शिक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धांतला विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. मात्र काही काळापूर्वीच त्याच्या वडिलांचे अल्पशा आजाराने निधन झाले. या कठीण प्रसंगानंतरही सिद्धांतने आपले ध्येय सोडले नाही.

या वेळी अबॅकस क्लासचे शिक्षक रवींद्र पाटील यांनी सिद्धांतला मोठा आधार दिला. “सिद्धांतची जबाबदारी आमची आहे,” असे सांगत त्यांनी त्याची फी माफ केली आणि त्याला सातत्याने मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धांतने सातत्याने सराव करत अबॅकसच्या आठही लेव्हल्स पूर्ण करण्याचे मोठे यश मिळवले.

धुळे येथे झालेल्या स्पर्धेत ‘मॅप ऑफ मॅजिशियन’ हा किताब जिंकून सिद्धांतच्या यशस्वी प्रवासाची सुरुवात झाली होती. त्यानंतर विविध स्तरांवर स्पर्धांमध्ये सहभागी होत त्याने आपली प्रतिभा सिद्ध केली. पुणे येथे झालेल्या स्पर्धेत आठवी लेव्हल पूर्ण करताना त्याने नॅशनल ट्रॉफीही पटकावली. हा क्षण त्याच्या कुटुंबासाठी अत्यंत भावूक ठरला. त्याची आई अनिता शार्दुल यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. “बाळा, तू तुझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करून त्यांना खरी श्रद्धांजली वाहिली आहेस,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पुण्यातील यशानंतर सिद्धांत भडगाव येथे परतल्यावर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. विश्वकर्मा फाउंडेशन आणि सकल सुतार समाज, भडगाव यांच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी विठोबा मिस्तरी, किरण देवरे, बापूराव शार्दुल, दीपक वाघ, शरद हिरे, शरद निकम, दीपक गवळी, ईश्वर देवरे, एकनाथ खैरनार, गणेश खैरनार यांसह अनेक मान्यवर आणि समाजबांधव उपस्थित होते.

सिद्धांतच्या या यशामागे त्याची आई अनिता शार्दुल, आजी मंदाबाई, आत्याआजी शांताबाई, आजोबा सुभाष नाना तसेच कपूर अहिरे, भालचंद्र अहिरे, मनीषा हिरे आणि शार्दुल, अहिरे व सूर्यवंशी परिवाराचे मोठे योगदान आहे. त्यांच्या पाठबळामुळेच सिद्धांतने कठीण परिस्थितीतही आपले ध्येय गाठले.

यशानंतर सिद्धांतने आपली भावना व्यक्त करत सांगितले की, वडिलांचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून भविष्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याचे ध्येय त्याने निश्चित केले आहे. आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा मान उंचावण्यासाठी हा यशाचा प्रवास पुढेही कायम ठेवणार असल्याचा निर्धार त्याने व्यक्त केला.


Protected Content

Play sound