Home क्राईम भडगावात दुर्दैवी घटना : मुलांना वाचवताना दोघांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू

भडगावात दुर्दैवी घटना : मुलांना वाचवताना दोघांचा गिरणा नदीत बुडून मृत्यू


भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भडगाव शहरालगतच्या गिरणा नदीपात्रात मुलांना वाचवण्यासाठी धाडसाने नदीत उतरलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली. या दुर्दैवी घटनेमुळे भडगाव शहरासह परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नदीम खान नसीम खान (वय २७) व काफिया शरीफ पिंजारी (वय १६) हे दोघे गिरणा नदीपात्रात अडकलेल्या लहान मुलांना वाचवण्यासाठी तातडीने नदीत उतरले. मात्र नदीपात्रातील खोल खड्ड्यांमुळे त्यांचा तोल जाऊन दोघेही पाण्यात बुडाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांनी प्राण गमावल्याने नागरिकांकडून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या मते गिरणा नदीपात्रात रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साहाय्याने सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे मोठ्या प्रमाणात खोल खड्डे तयार झाले आहेत. याच खड्ड्यांमुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. नदीपात्रातील अवैध वाळू उपशावर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस व महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. महसूल विभागाचे अविनाश जंजाडे व प्रशांत कुंभारे, पोलिस निरीक्षक महेश शर्मा, राजू अहिरे, इकबाल शेख यांनी घटनास्थळी पाहणी केली.

नगरसेवक इमरान अली सय्यद यांनी पोलीस, महसूल प्रशासन व नगरपालिका यांना तातडीने सूचना देत मदतकार्य वेगाने राबवण्याचे निर्देश दिले. तसेच नगरसेवक आसिमभाऊ अलीम शाह व डॉ. विजयकुमार देशमुख यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून मृतांच्या कुटुंबीयांना धीर दिला.

नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी पाचोरा येथून नदीत शोधमोहीम राबवण्यासाठी कर्मचारी पाठवले. आरोग्य विभागाचे छोटे वैद्य, अजय कंडारे तसेच पाचोरा येथील गोताखोर हुसेन दादा यांनी शोध व मदतकार्यात मोलाची भूमिका बजावली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भडगाव ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. या घटनेमुळे भडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून मुलांचे प्राण वाचवताना स्वतःचे प्राण गमावणाऱ्या दोघांच्या धाडसाचे नागरिकांकडून कौतुकही व्यक्त केले जात आहे.


Protected Content

Play sound