
जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील आनंद नगर भागात भरदिवसा एका घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख ६८ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दरबार नवलसिंग राठोड (वय ३७, शिक्षक कॉलनी, जामनेर) हे आपल्या भाड्याच्या घरात राहत असताना ही चोरी झाली. ३ मार्च रोजी दुपारी १२ ते ७ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान फिर्यादी बाहेर गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला लक्ष्य केले. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडा तोडून आत प्रवेश केला. घरातील गोदरेज कपाटाचे लॉक तोडून त्यातील मौल्यवान दागिने चोरून नेले.
चोरट्यांनी घरातून १ लाख २० हजारांचे सोन्याच्या अंगठ्या, ३६ हजाराचे सोन्याची चैन, ९ हजारांची पांचाली आणि चांदीच्या वस्तू असा एकुण १ लाख ६८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे करत आहेत.



