
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सी.ए. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी आणि सदस्यांसाठी अधिक सक्षम पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने जळगाव सी.ए. शाखेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत भुसावळ आणि जळगाव येथे नव्या वाचन कक्षांचे उद्घाटन करण्यात आले असून आय.सी.ए.आय. भवन, जळगाव येथे इमारत नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचा शुभारंभही करण्यात आला.

सोमवार, २ मार्च रोजी भुसावळ येथे २५ आसनक्षमतेच्या वाचन कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शुक्रवार, ६ मार्च रोजी के.सी.ई. सोसायटीच्या मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव येथे ३५ आसनक्षमतेच्या अतिरिक्त वाचन कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे सी.ए. विद्यार्थ्यांना शांत आणि अभ्यासपूरक वातावरणात अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
या कार्यक्रमाला मंत्री संजय सावकारे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, उपजिल्हाधिकारी जितेंद्र कुवर, केंद्रीय परिषद सदस्य सी.ए. अर्पित काबरा, जळगाव सी.ए. शाखेचे अध्यक्ष सी.ए. हितेश आगीवाल यांच्यासह के.सी.ई. सोसायटीच्या मुळजी जेठा महाविद्यालयाच्या शैक्षणिक संचालक डॉ. मृणालिनी फडणवीस उपस्थित होत्या. तसेच सी.ए. अब्दुल्ला अर्सिवाला, सी.ए. रोशन रुणवाल, सी.ए. लक्ष्मिकांत लाहोटी, सी.ए. करण काबरा, सी.ए. नचिकेत जाखेटीया आणि सी.ए. मुकेश अग्रवाल यांचीही उपस्थिती होती.
याच दिवशी आय.सी.ए.आय. भवन, जळगाव येथे इमारतीच्या नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून शाखेच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करून सदस्य आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगले व्यावसायिक वातावरण निर्माण करण्याचा मानस असल्याची माहिती शाखेचे अध्यक्ष सी.ए. हितेश आगीवाल यांनी दिली.
यावेळी जळगाव सी.ए. शाखेच्या संकेतस्थळाचे (वेबसाईट) लोकार्पण महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते करण्यात आले. या संकेतस्थळाच्या माध्यमातून शाखेच्या विविध उपक्रमांची माहिती सदस्य आणि विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होणार आहे.
जळगाव सी.ए. शाखा नेहमीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच सदस्यांच्या व्यावसायिक विकासासाठी कटिबद्ध राहिली आहे. अद्ययावत आणि वातानुकूलित वाचन कक्षामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल वातावरण मिळणार असून विशेषतः ग्रामीण भागातील गरीब सी.ए. विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल आणि त्यांच्या प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास शाखेचे अध्यक्ष सी.ए. हितेश आगीवाल यांनी व्यक्त केला.



