Home आंतरराष्ट्रीय एलिस पेरीची कसोटीत ऐतिहासिक कामगिरी; ‘ही’ कामगिरी करणारी पहिली महिला क्रिकेटपटू

एलिस पेरीची कसोटीत ऐतिहासिक कामगिरी; ‘ही’ कामगिरी करणारी पहिली महिला क्रिकेटपटू


पर्थ-वृत्तसेवा | भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये एकमेव कसोटी सामना खेळला जात आहे. याआधी तीन सामन्यांची टी-२० मालिका आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली होती. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव १९८ धावांवर आटोपला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर ३ बाद ९६ धावा केल्या होत्या. त्या वेळी एलिस पेरी ४३ धावांवर तर अ‍ॅनाबेल सदरलँड २० धावांवर नाबाद होती.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. मात्र तिचे तिसरे कसोटी शतक थोडक्यात हुकले. पेरीने ११६ चेंडूत ७६ धावांची खेळी केली. भारतीय गोलंदाज दीप्ती शर्माने तिला एलबीडब्ल्यू बाद करत तिची झुंज संपवली.

पेरीने या खेळी दरम्यान एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. तिने तिच्या १५ व्या कसोटी सामन्यातील २४ व्या डावात १००० धावांचा टप्पा गाठला. यामुळे ती महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या टॉप १० यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये १००० पेक्षा जास्त धावा करणारी आणि ३० पेक्षा अधिक विकेट्स घेणारी ती एकमेव महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

याशिवाय सर्व आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये १००० पेक्षा जास्त धावा करणारी ती दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तसेच तिने ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज फलंदाज कॅरेन रोल्टनला मागे टाकत ऑस्ट्रेलियन महिला संघासाठी कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज होण्याचा मानही पटकावला आहे.

एलिस पेरीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अत्यंत उल्लेखनीय राहिली आहे. तिने आतापर्यंत १६५ एकदिवसीय सामने खेळले असून १३७ डावांमध्ये ४८.४३ च्या सरासरीने आणि ७८.४८ च्या स्ट्राईक रेटने ४,५०४ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिच्या नावावर ३ शतके आणि ३७ अर्धशतके आहेत. तसेच १७१ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये तिने २,२०१ धावा केल्या असून तिची सरासरी ३०.१५ आणि स्ट्राईक रेट ११६.८२ इतका आहे.

गोलंदाजीतही पेरीने तितकीच प्रभावी कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तिने ३९ विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये तिच्या नावावर १६६ विकेट्स आहेत, तर आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये तिने १२६ फलंदाजांना बाद केले आहे.


Protected Content

Play sound